बदलापूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणपती हे दीड किंवा अडीच दिवसांचेच असतील असा निर्णय घेण्यात आला आहे. एवढंच नाही तर श्रींच्या विसर्जनासाठी फक्त दोनच कार्यकर्ते जातील असाही निर्णय घेण्यात आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, पोलीस गणपती मंडळ या सगळ्यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गणेशोत्सव नियम पाळून आणि मर्यांदासह साजरा करण्यात यावा असं आवाहन महाराष्ट्र सरकारने केलं आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या गोष्टीसाठी संमती दर्शवली आहे. दरम्यान बदलापुरात सार्वजनिक गणेशोत्सव हा दहा दिवसांचा न करता दीड किंवा अडीच दिवसांचा करण्यात यावा असा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला आहे.

२२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. पण करोनामुळे या उत्सवावर विघ्न आलंय. हा उत्सव यंदा धुमधडाक्यात करता येणार नाही. त्यासंदर्भात गृहखात्यानं नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, गणेश मंडळांच्या बाप्पांची मूर्ती जास्तीत जास्त चार फूट उंच असावी. घरी स्थापना करण्यात येणाऱ्या गणपतीची मूर्ती दोन फुटांपेक्षा अधिक नसावी, असंही नियमावलीत म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. त्यात त्यांनी गणपती बाप्पाची मूर्तीची उंची कमी ठेवण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या.