पक्षीप्रेमींसाठी पर्वणी; उपलब्ध अन्न आणि मानवी हस्तक्षेप नसल्याने मुक्त विहार

निसर्गश्रीमंत अशी ओळख असलेल्या बदलापूर शहराचे अनेक पैलू आहेत. त्यात शहरातील तलावांची संख्याही अधिक असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडते. मात्र विविध पक्ष्यांना आश्रय देणारा एकमेव तलाव वडवली शिवमंदिरालगत आहे. बदलापूरच्या वेशीवर, परंतु अंबरनाथ पालिकेच्या हद्दीत हा तलाव आहे. सध्या त्यात अनेक देशी स्थानिक पक्ष्यांनी आश्रय घेतला असून पक्षीप्रेमींसाठी उन्हाळ्यातील ही अपवादात्मक पर्वणी आहे.

बदलापूर शहरात विविध भागांत अनेक तलाव आहेत. त्यातील बहुतेक तलावांमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली मानवी हस्तक्षेप झाल्याने ते आपली स्वत:ची नैसर्गिक ओळख गमावून बसले आहेत. अनेक ठिकाणी तलावाच्या काठी पायवाट, कडे उभारल्याने पक्ष्यांचा नैसर्गिक वावर कमी झाला आहे. मात्र बदलापूर पश्चिमेतील वडवली भागात असलेल्या शिवमंदिराच्या किनारी एक तळे आहे. शहर आणि आसपासच्या भागातील हे एकमेव तळे आहे, ज्याला अद्याप मानवाचा धक्का पोहोचला नाही. तसेच आजही या तलावात पाहुणे पक्षी हजेरी लावतात. हिवाळ्यात हिमालय, आशिया भागातून प्रवास करत लांब शेपटीचा ग्रे गॉगटेल हा धोबी पक्षी, पर्पल हेरॉन हा बगळा, ब्लू किंगफिशर, ओपन बिल स्टॉर्क, लिटल ग्रेब, लेसार व्हिसलिंग डक्स, लिटल कॉरमोरंट, ब्राँझ विंग जकाना. लॉग टेल श्रायिक हा घाटावरून येणारा पक्षी, एशियनन पाईड स्टलिंग ही मैना, काळ्या पांढऱ्या रंगाची कॉटन पिग्मी गूज ही बदके असे अनेक प्रवासी पक्षी येत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी हा महत्त्वाचा तलाव आहे. ऐन उन्हाळ्यातही या तलावात पाईड किंगफिशर, पर्पल हेरॉन, पॉन्ड हेरॉन, येल्लो वॉगटेल, पाईड वॉगटेल, पॉन्डी असे अनेक पक्षी येथे वावरताना दिसत आहेत. पक्षीप्रेमींसाठी ऐन उन्हाळ्यात ही अनोखी पर्वणी मानली जात आहे. अन्नाची उपलब्धता, किडे, आवश्यक झाडे, पाण्यातील वनस्पती याचा पुरेसा साठा असल्याने येथे अशा पक्ष्यांचा वावर होत असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. त्यात या तलावात मानवी हस्तक्षेप न झाल्याने पक्षी इथे मनसोक्तपणे वावरतात. त्यामुळे या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य कायम राखण्याची गरज असल्याचे मत पक्षप्रेमी सचिन दाव्‍‌र्हेकर यांनी व्यक्त केली आहे. बदलापूर शहरात असूनही अंबरनाथ नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या या तलावाची हिरवळ कायम राखण्याचे आव्हान स्थानिक प्रशासनासमोर आहे.