आयरेमधील रहिवाशांचा आरोप; भूमाफियांसोबत ‘साटेलोटे’ असल्याचा आरोप

डोंबिवली पूर्व भागातील आयरे गाव परिसरात नव्याने उभ्या राहत असलेल्या चाळींमध्ये बेसुमार बेकायदा नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत. या जोडण्या महापालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरून घेऊन या पाण्याचे देयक रहिवासी महापालिकेला भरणा करीत नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या आहेत. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयरे गाव परिसरातील ज्योतीनगर झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या २१ नळजोडण्यात तोडल्या आहेत, अशी तक्रार या भागातील रहिवाशांनी पालिकेकडे केली आहे. बेकायदा चाळी आणि जोडण्यांवर कारवाई झालेलीच नाही, असा रहिवाशांचा दावा आहे.

ज्योतीनगर झोपडपट्टीमध्ये गेल्या २५ ते ३० वर्षांपासून रहिवासी राहत आहेत. या रहिवाशांची पाण्याची तहान भागविण्यासाठी या भागात तीन ते चार ठिकाणी सार्वजनिक नळ उभारण्यात आले आहेत. तसेच काही रहिवाशांनी व्यक्तिगत नळजोडण्या घेतल्या आहेत. या झोपडपट्टीतील रहिवासी कचरावेचक, कष्टकरी, मजूर वर्गातील आहेत. रेल्वेलगत ज्योतीनगर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतील नळजोडण्या तोडायच्या, त्यांचे जगणे विस्कळीत करून ठेवायचे, वैतागून हे रहिवासी येथून निघून गेले की त्यांच्या जागांवर चाळी, इमारती बांधायच्या, असा डाव या भागातील भूमाफिया, विकासक आणि काही लोकप्रतिनिधींनी रचला आहे, अशी तक्रार या भागातील रहिवाशांनी पालिकेकडे केली आहे.

येत्या आठवडाभरात ज्योतीनगर भागातील नळजोडण्या जोडून देण्यात आल्या नाहीत तर आपण पालिकेसमोर उपोषणाला बसू, असा इशारा या भागातील माजी नगरसेवक रवी पाटील यांनी दिला आहे. या झोपडपट्टीला लागून शेकडो बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आहेत. या चाळींना महापालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरून नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत. त्या तोडण्याची हिंमत पालिका अधिकारी का दाखवीत नाहीत, असा सवालही करण्यात येत आहे. माफिया, विकासकांबरोबर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्नेहाचे संबंध असल्यामुळे ते बेकायदा चाळींमधील एकही नळजोडणी तोडत नाहीत, अशी टीका माजी नगरसेवक पाटील यांनी केली आहे.

बांधकामात अडथळा

गेल्या आठवडय़ात महापालिका कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना दाखवण्यासाठी ज्योतीनगर झोपडपट्टीतील नळजोडण्या तोडल्या. नवीन बेकायदा चाळी भागातील एकही नळजोडणी या कर्मचाऱ्यांनी तोडलेली नाही, असे पाटील यांनी सांगितले. ज्योतीनगर झोपडपट्टी ही बांधकामात अडथळा ठरत आहे. त्यामुळे ही झोपडपट्टी हटवून तेथे चाळी, इमारतींची बांधकामे करण्यासाठी या झोपडपट्टीला लक्ष्य करण्याचे प्रयत्न सर्व स्तरांतून सुरू आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे नाटक पाहावे!

आयुक्त ई. रवींद्रन यांनी आदेश दिले की ग प्रभागाचे प्रभाग अधिकारी आयरे गावात येऊन मोजकीच बेकायदा बांधकामे तोडण्याचा दिखावा करतात. पाणी जोडण्या तोडण्याचे आदेश दिले की माफियांशी संगनमत करून बेकायदा चाळींऐवजी झोपडपट्टीतील नळजोडण्या तोडल्या जातात. कर्मचाऱ्यांचे हे नाटक पाहण्यासाठी आयुक्त रवींद्रन यांनी स्वत: आयेर गाव, ज्योतीनगर, भोपर, कोपर पूर्व भागाला भेट द्यावी, अशी मागणी ज्योतीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी केली आहे.