भातशेतीच्या कामात अडकल्याने कामगारांचा भट्टय़ांकडे उशिरा प्रवास

भगवान मंडलिक, कल्याण</strong>

सप्टेंबर महिन्यात पावसाने विश्रांती घेताच वीटभट्टय़ांवर वीटा पाडण्याचे नियोजन सुरू होते. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने वीटभट्टीचालकांचे नियोजन बिघडले असून हा व्यवसायही संकटात सापडला आहे. भातकापणीचा हंगामही अजून सुरू असल्याने वीटभट्टी कामासाठी लागणारा मजूर वर्ग वीटभट्टी मालकांना उपलब्ध झालेला नाही.

ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, शहापूर ग्रामीण भागात ऑक्टोबर ते जून या कालावधीत वीटभट्टी व्यवसाय तेजीत असतो. सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाचे संकेत मिळाले की, विटा पाडण्याच्या कामासाठी पट (मैदान) तयार करण्याची कामे करून ठेवतो. भातकापणी, मळणीचा हंगाम पूर्ण झाला की आदिवासी भागातील नेहमीचे मजूर आपल्या कुटुंबासह वीटभट्टीवर हजर होतात. हा अनेक वर्षांचा पायंडा या वर्षी प्रथमच परतीचा पाऊस लांबल्याने मोडला आहे, असे वीटभट्टीमालक किसन म्हात्रे यांनी सांगितले.

विकासकांनी आगाऊ नोंदण्या करून ठेवल्या आहेत. परतीचा पाऊस लांबल्याने विटा पाडणे शक्य झालेले नाही. त्यामुळे त्यांना वेळेत विटा पुरवणे शक्य झालेले नाही, असे वीटभट्टीमालकांनी सांगितले.

भिवंडी तालुक्यातील प्रत्येक गावात सात महिने विटा पाडण्याचा उद्योग केला जातो. मजुरांची एक मोठी साखळी या व्यवसायावर उपजीविका करते. या कामासाठी ट्रक, डम्पर लागतात त्यांना रोजगार मिळतो. हा व्यवसाय असंघटित असल्याने शासनाचे या व्यवसायाकडे फारसे लक्ष नाही, अशी खंत वीटभट्टी व्यावसायिकांनी व्यक्त केली. कल्याणमधील वाडेघर, शहापूर तालुक्यातील भातसा नदी काठच्या सापगाव गावात वीटभट्टीचा मोठा व्यवसाय आहे.

पाऊस कधी येईल याची वेळ ठरली नसल्याने घाबरत आम्ही सध्या विटा पाडणे, भाजणीसाठी वीटा भट्टीत रचण्याची कामे करीत आहोत, असे केशव वारघडे यांनी सांगितले.

परतीच्या पावसाने या वेळी वीटभट्टीमालकांची सगळीच गणिते बिघडवली आहेत. पावसाची भीती मनात ठेवूनच काही मालकांनी विटा पाडण्याची कामे सुरू केली आहेत. या उद्योगातून हजारो कामगारांना रोजगार मिळतो. त्यामुळे या व्यवसायासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

– दिनेश बेलकरे , स्वयंसेवी ग्रुप, भिवंडी