07 March 2021

News Flash

कॅलिग्राफीच्या साथीने लॉकडाउनला हरवणारा कलाकार

डोंबिवलीच्या रस्त्यांवर नेमप्लेट तयार करुन संघर्ष करणाऱ्या सुरेश सूर्यवंशींची कहाणी

वर्षाच्या सुरुवातीला जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रभाव आजही कायम आहे. आतापर्यंत लाखो लोकांचे जीव या विषाणूने घेतले. या विषाणूचा सामना करण्यासाठी भारतात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आलं. राज्यांतर्गत रेल्वे, विमान, रस्ते प्रवास बंद करण्यात आला. सध्या अनलॉकच्या माध्यमातून अनेक गोष्टी हळुहळु सुरळीत होण्याच्या मार्गावर आहेत. परंतू लॉकडाउनमध्ये देशातील लाखो लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांच्या हातचा रोजगार गेला, लॉकडाउनमध्ये आलेल्या निराशेपोटी अनेकांनी आपलं आयुष्यही संपवलं. परंतू मुळचा औरंगाबादचा असलेल्या एका कलाकाराने आपल्या कलेच्या सहाय्याने या लॉकडाउनवरही मात करुन दाखवली आहे. जगात कितीही वाईट गोष्टी घडत असल्या तरीही आपण सकारात्मक रहायचं आणि कलेची जोपासना करत रहायची हे सूत्र डोक्याशी पक्क धरुन मुळचे औरंगाबादचे सुरेश सूर्यवंशी आपलं आयुष्य जगत आहेत. कष्ट करणाऱ्या तयारी असणाऱ्या माणसाचं लॉकडाउनही काही बिघडवू शकत नाही हे सुरेश यांनी दाखवून दिलं आहे.

सुरेश सूर्यवंशी मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे. सुरेश यांचं शिक्षण B.Sc पर्यंत झालेलं…पण शिक्षणानंतर त्यांची अक्षरांशी अधिक चांगली मैत्री झाली. विविध शैलीत अक्षरं काढून नाव तयार करुन देण्याचा छंद त्यांना होता. आपल्यात असलेल्या या कलेला कॅलिग्राफी म्हणतात हे सुरेश यांना सुरुवातीला माहितीही नव्हतं. सुरुवातीची ८-१० वर्षी औरंगाबादमध्ये काम करत असताना सुरेश यांना आपण करत असलेल्या कामाला कॅलिग्राफी म्हणतात असं समजलं. यानंतर स्थानिक प्रदर्शनांमधून सुरेश आपली कला इतरांपर्यंत पोहचवायला लागले. दरम्यानच्या काळात सुरेश यांनी टॅटू ची कलाही शिकून घेतली. औरंगाबादमधील कॉलेज, गार्डन, बिबी का मकबरा अशा ठिकाणी उभं राहून सुरेश लोकांना त्यांच्या नावाचे टॅटू बनवून द्यायचे. प्रत्येक सामान्य व्यक्तीप्रमाणे सुरेश यांनाही मुंबईला जाऊन आपली कला इतरांना दाखवायची होती. दोन लाखांचं कर्ज काढून सुरेश आपल्या परिवारासह दोन वर्षांपूर्वी मुंबईत आले.

कोणत्याही कलाकाराच्या नशिबात संघर्ष हा कायम लिहीलेला असतो. सुरेशही त्याला अपवाद ठरले नाही. काही वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चात आलेल्या लोकांच्या हातावर टॅटू काढून ४०-५० रुपये कमावणाऱ्या सुरेश यांना मुंबईत आल्यानंतर बराच संघर्ष करावा लागला. मुंबईत राहण्याची जागा परवडणारी नव्हती म्हणून त्यांनी डोंबिवलीत घर घेतलं. काम मिळावं यासाठी नरिमन पॉईंट, वांद्रे स्टेशन, कल्याण स्टेशन बाहेर उभं राहून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना त्यांच्या नावाचे टॅटू बनवून द्यायचे. काळासोबत रहायचं म्हणून सुरेश यांनी मोबाईल App आणि अत्याधुनिक पेन ही खरेदी केली. मुंबईत हळुहळु जम बसतोय असं वाटत असतानाच लॉकडाउनचा फेरा आणि सगळं चित्रच पालटलं. दोन अडीच महिन्यांच्या काळात सूर्यवंशी यांनी आपलं गाव गाठलं. आजुबाजूला करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात शेती करणाऱ्या आई-बाबांनी सुरेश यांना आता परत मुंबईला जाण्याची गरज नाही असं सांगितलं. परंतू मुंबईत आपलं नाव मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या सुरेश यांना घरच्यांचं म्हणणं पटलं नाही. मेहनत करण्याची तयारी असताना घरात बसून आपण पाहिलेल्या स्वप्नाचा विचार करायचा नाही हे त्यांच्या मनाला पटलं नाही.

शेवटी घरच्यांची समजून काढून सुरेश आपल्या परिवारासह पुन्हा एकदा डोंबिवलीला आले. आल्याआल्या त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. शहरांमध्ये इमारतीत राहणारी लोकं आणि त्यांच्या दारावरच्या नेमप्लेट हा धागा पकडत सुरेश यांनी कॅलिग्राफिच्या माध्यमातून नेमप्लेट बनवण्यास सुरुवात केली. डोंबिवली पश्चिमेला रस्त्यावर सुरेश यांनी काम सुरु केलं. यावेळी रस्त्यावर जाणाऱ्या एका मुलाला सुरेश यांचं काम दिसलं. त्याने सुरेश यांच्या कॅलिग्राफीचे काही फोटो घेत फेसबूकवर पोस्ट केले. फेसबूकवर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सुरेश यांना नेमप्लेटसाठी फोन यायला लागले. आपल्या कामाला अचानक वाढलेला प्रतिसाद पाहून सुरेश यांनाही पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. पण काहीही झालं तरीही हार मानायची नाही हे ठरवलेल्या या संधीचं सोनं करायचं ठरवलं. डोंबिवलीत राहणाऱ्या व्यक्तींसाठी ४०० ते ५०० रुपयात तर डोंबिवली बाहेर राहणाऱ्या व्यक्तींसाठी ९९९ रुपयात सुरेश नेमप्लेट घरपोच पोहचवायला लागले. घरातून निघताना आईला, मला अजून दोन-अडीच वर्ष दे…मुंबईला जाऊ दे असं सांगून निघालेल्या सुरेश यांना स्वतःचा अभिमान वाटतो. आजुबाजूला परिस्थिती बिकट असतानाही सुरेश आपल्या कलेच्या सहाय्याने परिस्थितीशी झुंज देत आहेत.

लॉकडाउन काळातही सुरेश यांनी कॅलिग्राफीचा सराव कधीही सोडला नाही. कॅलिग्राफीची प्रात्यक्षिक करताना सुरेश लॉकडाउनच्या काळात फेसबूक लाईव्ह करायचे. यातून नवीन मोबाईल App च्या माध्यमातून आपल्या मित्रांची नावं तयार करुन देणं, टॅटूची नवीन डिझाईन्स असा सर्व सराव सुरेश करत होते. एकीकडे परिस्थितीसमोर हार मानत आत्महत्येसारखी पावलं उचलणारी अनेक उदाहरणं आपण या काळात बघितली. परंतू मनात पक्क केलं, तर लॉकडाउनसारख्या राक्षसालाही तोंड देता येतं हे सुरेश सूर्यवंशी यांनी सिद्ध केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 10:02 am

Web Title: calligraphy artist from dombivali making nameplates with his art decide to fight in lockdown success story psd 91
Next Stories
1 किरकोळीत ग्राहकांची लूट
2 इमारतींची गच्ची, चाळींमध्ये छुप्या पद्धतीने गरब्याचे आयोजन
3 काळू धरण प्रकल्प पुन्हा लांबणीवर?
Just Now!
X