|| किशोर कोकणे

पोलिसांच्या तपासादरम्यान सीसीटीव्हीची सद्य:स्थिती उघड; महापालिकेचा मात्र इन्कार

ठाणे : ठाणे येथील हाजुरी परिसरात महापालिकेने उभारलेल्या कमांड अँड डाटा सेंटरचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोठय़ा थाटामाटात करण्यात आले असतानाच, या सेंटरला जोडण्यात आलेले ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब गुन्ह्य़ाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. महापालिका प्रशासनाने मात्र सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीतपणे सुरू असल्याचा दावा केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राच्या विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षांत एकूण १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात आली असून या कॅमेऱ्यांमुळे सोनसाखळी चोरी तसेच रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा घालणे शक्य होणार असल्याचा दावा महापालिकेने केला होता. तसेच गुन्ह्य़ाच्या  तपासासाठी पोलिसांना हे कॅमेरे उपयुक्त ठरणार असल्याचाही दावा केला होता. मात्र, शहरात अनेक ठिकाणी कॅमेरे बंद असल्याची बाब गुन्ह्य़ाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास येत असून काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाजप नगरसेवकांनी ही बाब उघडकीस आणली होती. त्यानंतर महापालिका शहरातील कॅमेरे बंद राहणार नाहीत याची खबरदारी घेईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र ती फोल ठरली आहे. ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा, पाचपाखाडी, तलावपाळी, हरिनिवास सर्कल, चरई आणि टेंभीनाका या भागांतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. पोलिसांनी काही गुन्ह्य़ांच्या तपासासाठी या कॅमेऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला असता, ही बाब उघड झाली. कॅमेरे बंद असल्यामुळे या भागात एखादी गुन्हेगारी घटना घडली तरी पोलिसांना तिचे चित्रीकरण उपलब्ध होत नाही.

वीजजोडणीच खंडित

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणामध्ये गुन्हेगार दिसला तर त्यामध्ये वाहनांच्या क्रमांकाची पाटी मात्र स्पष्टपणे दिसून येत नाही. अशा प्रकारचे आरोप करत भाजप नगरसेवकांनी कॅमेऱ्याच्या दर्जाबाबत सर्वसाधारण सभेत काही महिन्यांपूर्वी प्रश्न उपस्थित केले होते. त्यापाठोपाठ आता गुन्ह्य़ाच्या तपासादरम्यान त्याचा प्रत्यय पोलिसांना येत असून काही ठिकाणी कॅमेऱ्यांच्या वीजजोडणीच्या तारा तुटलेल्या आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ठाणे शहरात बसविण्यात आलेले १४०० सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीतपणे सुरू असून कमांड अँड डाटा सेंटर येथे शहरातील कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाची पाहाणी कर्मचाऱ्यांमार्फत २४ तास सुरू असते. तसेच कॅमेऱ्यांमध्ये काही बिघाड झाला तर त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात येते. – विनोद गुप्ता, उपनगर अभियंता, विद्युत विभाग, ठा.म.पा.