कुत्र्याच्या बरोबरीनेच माणसाच्या घरात घरोबा करून राहणाऱ्या पाळीव प्राण्यांमध्ये मांजर मोठय़ा प्रमाणात आढळते. दिवाणखान्यात, सोफ्यावर, बाल्कनीतल्या कट्टय़ावर आरामात पहुडलेली मांजरे अनेक घरांमध्ये दिसून येतात. ठाण्यातील व्यावसायिक श्रीहरी रबाडे यांनी मात्र स्वतंत्र घरात मांजरांची व्यवस्था केली आहे.

येऊरमध्ये राहणाऱ्या श्रीहरी रबाडे यांनी मांजरांची स्वतंत्रपणे देखभाल करता यावी म्हणून पाच वर्षांपूर्वी घरालगत स्वतंत्र कॅटहाऊस बांधले. दरम्यान अलिकडेच त्यांनी भिवंडी तालुक्यातील सायवान गावात साडेतीन एकर जागेत मोठे घर बांधले आहे. तिथे जागा मोठी असल्याने आता मांजरींची व्यवस्था तेथील कॅटहाऊसमध्ये करण्यात आली आहे. त्यांच्याकडे २० मांजरी आणि दहा बोके असून भांडणे होऊ नयेत म्हणून त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

या कॅट हाऊसमध्ये चार महिन्यांपासून ५ वर्षांच्या मांजरांपर्यंत विविध वयोगटातील मांजरे आहेत. त्यात इंडियन बेन्गोल कॅट, चायनीज कॅट, परशियन क्रॉस ब्रिड कॅट आदी विविध जातीच्या मांजरी येथे गुण्यागोविदाने राहतात. या मांजरांना आठवडय़ातून एकदा ताजे मासे खायला दिले जातात. तर आठवडय़ातून दोनदा चिकन आणि दररोजसाठी कॅट फुड आणि छोटय़ा मांजरीच्या पिल्लांसाठी १ लिटर दुध, घरी केलेला चविष्ट पदार्थ दिला जातो. या कॅट हाऊसला दर १५ दिवसांनी राबाडे भेट देतात. शिवाय त्या मांजरीची देखभाल करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक त्यांनी केली आहे. या मांजरींच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी दर १५ दिवसांनी ठाण्यातील डॉ. ठाणगेही जात असतात. एखादी मांजर अधिक आजारी असल्यास तिला  ताबडतोब डॉ ठाणगे यांच्या दवाखान्यात आणले जाते आणि त्यांच्यावर उपचार केले जातात. याशिवाय ते राहत असलेल्या ठाण्यातील घरात सात मांजरी असून त्यातील तीन मांजरी अपंग आहेत. रस्त्यावर फिरत असलेल्या छोटय़ा मांजरींना ते घरी आणतात. थोडय़ा मोठय़ा होईपर्यंत ते त्यांची राहत्या घरीच काळजी घेतात आणि नंतर कॅट हाऊसमध्ये सोडतात. या मांजरी सांभाळण्यासाठी त्यांची पत्नी सुष्मा राबाडे याही त्यांना सहकार्य करतात. आपण जितके मुक्या प्राण्यांवर प्रेम करतो, त्यापेक्षाही ते आपल्यावर प्रेम करत असतात असे सांगतांना राबाडे यांनी मुक्या प्राण्यांच्या डोक्यावर मायेचे छत्र असावे त्यासाठी ‘हाऊस ऑफ देअर ओन’ या संकल्पनेतून प्राण्यांसाठी आश्रम उभारण्याचा त्यांची इच्छा असून त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.