05 August 2020

News Flash

कल्याण, डोंबिवलीवर कॅमेऱ्यांची ‘नजर’!

कल्याण डोंबिवली शहराचे गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने नागरीकरण झाले आहे.

येत्या वर्षभरात ३२० ठिकाणी ९०० सीसीटीव्ही कॅमेरे; विशेष प्रसंगी लक्ष ठेवण्यासाठी चार ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत

आशीष धनगर, लोकसत्ता 

कल्याण : शहरांतील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी तसेच येथील वाहतूक व्यवस्थेवरही काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक यंत्रणा उभारता यावी, याकरिता कल्याण-डोंबिवली महापालिकेने येत्या वर्षभरात या शहरांतील ३२० ठिकाणी ९०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आखलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून ही यंत्रणा उभी करण्याचे प्रयत्न केले जात असून विशेष प्रसंगी लक्ष ठेवण्यासाठी ४ ड्रोन कॅमेरेही खरेदी करण्यात येणार आहेत. ही सर्व यंत्रणा उभारण्यासाठी १२४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कल्याण डोंबिवली शहराचे गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने नागरीकरण झाले आहे. त्यासोबतच शहरातील गुन्हेगारी, वाहतूक बेशिस्त यांचे प्रमाणही वाढले आहे. यावर वचक ठेवता यावा, यासाठी पालिकेने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे दोन्ही शहरांत पसरवण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका आणि ठाणे पोलिसांतर्फे कल्याण-डोंबिवली शहरातील विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले होते. पोलिसांनी सुचवलेल्या ठिकाणीच हे सर्व कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. या कामासाठी आवश्यक असलेल्या सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून कल्याण- डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी १२४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या यंत्रणेच्या उभारणीचे आणि देखभाल दुरुस्तीचे काम पाच वर्षांसाठी एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. नोव्हेंबर अखेर ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे

* सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अद्ययावत सेन्सर असणार आहेत. त्यापैकी मुख्य चौकात असणाऱ्या कॅमेऱ्यांची जोडणी शहरातील सिग्नल यंत्रणेशी केली जाणार आहे. त्याद्वारे शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सिग्नलच्या वेळा बदलण्याची स्वयंचलित यंत्रणा या सेन्सरच्या माध्यमातून राबवली जाईल.

* कॅमेऱ्यांमधील सेन्सर शहरातील प्रदूषणावरही लक्ष ठेवणार आहेत. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार असून प्रदूषणाची माहिती या स्क्रीनवरून प्रदर्शित केली जाईल.

* सीसीटीव्हींवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन विशेष कक्षांची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी कल्याण- डोंबिवली महापालिका इमारतीच्या मुख्य भागात एक तर पोलीस उपायुक्त कार्यालय, कल्याण या ठिकाणी दुसरा कक्ष असणार आहेत.

* कक्षांमध्ये ५५ सेंटीमीटर आकाराच्या १५ एलईडी स्क्रीन असणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन आणि पोलीस एकाच वेळी शहरावर लक्ष ठेवू शकणार आहेत.

कल्याण- डोंबिवली शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. ही यंत्रणा उभारण्याचे काम सुरू झाले असून नोव्हेंबर अखेर हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

– प्रशांत भगत, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 2:56 am

Web Title: cctv camera will install in kalyan dombivali zws 70
Next Stories
1 मालवाहतूकदारांना मंदीची धास्ती
2 ठाण्यात शनिवारी ‘इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव’
3 मटण दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक
Just Now!
X