लांबचा फेरा टाळण्यासाठी वडोल पुलावरून रहदारी सुरू; पालिका ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ केल्यानंतर पर्यायी व्यवस्था करणार

गेल्या ३० वर्षांपूर्वी वालधुनी नदीवर उभारलेला वडोल गावचा पूल गेल्या आठवडय़ात कोसळला. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तब्बल ३ किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. हे टाळण्यासाठी अनेक पालक आणि विद्यार्थ्यां याच पुलावर तारेवरची कसरत करत ये-जा करतात. त्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तात्काळ यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी वाढत आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ येथील सम्राट अशोक नगर आणि वडोल गाव यांच्यामधून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर ३० वर्षांपूर्वी उल्हासनगरशी संपर्क सोपा व्हावा, या हेतूने हा पूल बांधण्यात आला होता. मात्र गेल्या ३० वर्षांत या पुलाची मोठय़ा प्रमाणात वाताहत होऊन अखेर गेल्या आठवडय़ात हा पूल कोसळला. या पुलावरून वाहनांची मोठी वर्दळ नसली तरी याचा वापर नागरिकांकडून होत होता. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी देखील शाळेत जाण्यासाठी याच पुलाचा वापर करत होते. त्यामुळे पूल पडल्यानंतर या विद्यार्थ्यांना आता तीन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. मात्र, हा मार्ग बंद झाल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वडोल गावात सेंट जोसेफ आणि एक हिंदी विद्यालय असून त्यात जवळपास ४ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. तसेच वडोलची लोकसंख्याही एक हजाराच्या घरात असल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांना जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. लांबचा फेरा टाळण्यासाठी अनेक पालक, विद्यार्थी आणि नागरिक याच तुटलेल्या पुलावर ये-जा करतात. त्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, पालिकेच्या शहर अभियंत्याशी संपर्क केला असता, सध्या तात्पुरत्या स्वरूपात पूल लोकांना ये-जा करण्यासाठी सुरू करावा यासाठी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले जाईल. तसेच येत्या ५ ते ६ दिवसात स्टील टाकून हा पूल लोकांना रहदारीसाठी सुरू केला जाईल, असे सांगितले.

आम्ही  हा पूल कमकुवत झाल्यामुळे नवीन पूल बांधण्याची मागणी उल्हासनगर महापालिकेकडे ४ वर्षांपूर्वीच केली होती. मात्र आता नवीन पूल होईपर्यंत विद्यार्थी आणि गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करावा, अशी मागणी केली आहे.

– पंचशीला पवार, उपमहापौर.