कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असतानाही काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक भिवंडी शहरातील रस्त्यांवर जागोजागी लावण्यात आल्याचे चित्र दिसून आले. मात्र, आचारसंहिता भंग झाल्याची बाब लक्षात येताच खडबडून जाग आलेल्या भिवंडी महापालिका प्रशासनाने फलक हटविण्याची कारवाई केली. हे फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने फलक लावणारे पदाधिकारी धास्तावले आहेत.

राहुल हे भिवंडीत येत असल्याची माहिती मिळताच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे फलक भिवंडीत जागोजागी लावले. दिवाणी न्यायालयाच्या बाहेरही फलकांची गर्दी दिसून येत होती. त्यामुळे अवघ्या शहराचे विद्रुपीकरण झाले होते. या फलकांमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची बाब सुरक्षेसाठी तैनात असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी याबाबत महापालिका प्रशासनाला कळविले. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिकेच्या पथकाने तत्काळ धाव घेऊन फलक हटविण्याची कारवाई सुरू केली. न्यायालयाबाहेरील परिसरात लावण्यात आलेले फलक हटविण्यात आले. मात्र, त्यानंतरही या भागात स्वागताचे फलक झळकत असल्याचे चित्र दिसून आले. या संदर्भात भिवंडी महापालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांच्याशी संपर्क साधला असता, शहरात बेकायदा लावण्यात आलेले फलक हटविण्याची कारवाई सुरू असून फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यातही फलकबाजी..

भिवंडी शहराप्रमाणेच ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर जागोजागी राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक झळकताना दिसून आले. याबाबत महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता, शहरात बेकायदा लावलेल्या फलक हटवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.