आयआयटी तज्ज्ञांचा अहवाल लांबल्याने मार्गिका सुरू करणे अशक्य; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

किशोर कोकणे
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कोपरी पुलाच्या कामाला वेग यावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मैदानात उतरले असले तरी येत्या वर्षभरात या पुलाच्या अतिरिक्त मार्गिकांचे काम पूर्ण होईल का याविषयी महानगर विकास प्राधिकरण आणि वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे. सद्य:स्थितीत तयार असलेल्या दोन नव्या मार्गिकांच्या कामाच्या दर्जाची तपासणी आयआयटी तज्ज्ञांकडून सुरू असून हा अहवाल येईपर्यंत या मार्गिका सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे या पुलाचे काम नऊ महिन्यांत पूर्ण करणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबई-ठाण्यातील वाहतुकीसाठी कोपरी रेल्वेपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून ठाणे, नाशिक, भिवंडी, कल्याण येथील हजारो वाहने मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करतात. कोपरी पुलाचा रस्ता अरुंद असल्याने या पुलाच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीए आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. रेल्वेच्या हद्दीतील भाग रेल्वे प्रशासन तर पोहोच रस्त्याचे काम एमएमआरडीए करत आहे. अनेक मुदती ओलांडत महिन्यांपूर्वी या पुलाच्या दोन नव्या मार्गिका तयार झाल्या आहेत. हे काम मार्च महिन्यात पूर्ण होणार होते. तांत्रिक अडचणींमुळे जून महिन्यात हे काम पूर्ण झाले. त्यानंतर नव्या मार्गिकांवरून वाहतूक सुरू झाल्यानंतर मुख्य मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार होते. नव्या मार्गिकांचा एमएमआरडीएने तयार केलेला पोहोच रस्त्याचा भाग असमान झाल्याचे आढळले तसेच संरक्षण कठडय़ालाही तडे गेल्याचे दिसून आले. नव्या कोऱ्या रस्त्याची ही अवस्था झाल्याने प्राधिकरणाने या रस्त्याच्या तपासणीसाठी आयआयटी तज्ज्ञांना पाचारण केले. या तज्ज्ञांचा अहवाल अद्याप प्रलंबित असून यामुळे नवाकोरा रस्ता तयार असूनही वाहनांसाठी खुला करण्यात आलेला नाही.

नऊ महिन्यांच्या मुदतीचे आव्हान

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उर्वरित मुख्य मार्गिकांचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मंगळवारी एका पाहाणीनंतर दिली. िशदे यांच्यासाठी सुरुवातीपासून या रस्त्याचे काम प्रतिष्ठेचे ठरले आहे. असे असले तरी नव्या मार्गिकांच्या आयआयटी अहवालाची प्रतिक्षा अजूनही संपत नसल्याने नव्या मार्गिकांचे काम कधी सुरू होणार याविषयीची अनिश्चितता कायम आहे. नव्या मार्गिकेवरील वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहतुकीचे नियोजन करून उर्वरित मार्गिकांचे काम हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर रेल्वे आणि एमएमआरडीएला एकत्रित हे काम हाती घ्यावे लागेल. रेल्वे, रस्ते मेगाब्लॉक तसेच एमएमआरडीएचे काम पाहता या कामाला नऊ महिन्यांहून अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता असून प्राधिकरण, रेल्वे आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये दबक्या सुरात हीच चर्चा आहे.

अडचणी काय?

एमएमआरडीए आणि रेल्वेने सध्या तयार केलेल्या नव्या मार्गिका या मुख्य जुन्या मार्गिकांना जोडून आहेत. मुख्य रस्त्याचे काम करण्यासाठी मुख्य रस्ता बंद करावा लागणार आहे. पावसाळ्याचे दिवस आणि करोनाकाळ असल्याने अनेक मजूर गावी गेले आहेत. त्यामुळे मजुरांची उपलब्धता कमी आहे. या मार्गावरून दिवसाला ६० हजारांहून अधिक वाहने दररोज ये-जा करतात. जुन्या मार्गिकेवर अडथळे उभारून गर्दीच्या वेळी अतिरिक्त मार्गिका तयार करणे सोपे होते. नव्या मार्गिकांवर तसे करणे पोलिसांना शक्य नाही. त्यामुळे बाराबंगला किंवा पर्यायी मार्गाची चाचपणी करावी लागणार आहे. त्यासाठीचे नियोजन अद्यापही झालेले नाही. तसेच आयआयटीचा अहवालही प्रलंबित आहे. तो आल्यानंतर त्यात कोणत्या दुरुस्त्या सुचविण्यात आल्या आहेत. त्यानुसार नव्या रस्त्याची बांधणी करावी लागणार आहे. यात बराच कालावधी जाऊ शकतो.