कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णांची संख्या आणि मृत्युदरात गेल्या आठवड्यापासून घट होत आहे. ही संख्या कमी होऊन शासन नियमाच्या दुसऱ्या किंवा पहिल्या थरात पालिकेचा समावेश व्हावा याची प्रतीक्षा शहरवासीयांना आहे.

वाढत्या करोना चाचण्या, ५० वर्षांवरील सर्व वयोगटातील करोना सकारात्मक रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात दाखल करणे, साथसदृश आजाराच्या रुग्णांवर तात्काळ उपचार करणे या तातडीच्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या कमी होत असल्याची माहिती वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्याने दिली. बहुतांशी करोनाबाधित रुग्ण सुरुवातीचे चार ते पाच दिवस घरात खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने राहून उपचार घेत होते. आजार वाढला की मग असे रुग्ण पालिका किंवा खासगी रुग्णालयात दाखल होत होते. अशा रुग्णांमधील संसर्ग वाढल्याने उपचार सुरू केल्यानंतरही त्यांच्याकडून अनेक वेळा प्रतिसाद मिळत नसे. असे रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक होते. प्रत्येक बाधित रुग्णावर पाळत ठेवल्यामुळे मृत्युदर घटला, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

मागील दोन महिन्यांच्या काळात शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागांतून करोनाबाधित रुग्ण कल्याण-डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांमध्ये येऊन उपचार घेत होते. असे रुग्ण उपचार घेत असताना दगावले तर त्यांचे अंत्यसंस्कार अनेक वेळा पालिका हद्दीतील स्मशानभूमीत केले जात होते. काहींचे नातेवाईकही अंत्यसंस्कारासाठी आले नाहीत. ही नोंद पालिका हद्दीतील मृत्यू नोंद पटावर होत होती.

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या घटल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे स्थानिक रुग्णसंख्येबरोबर मृत्युदर घटला आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या दोन महिन्यांच्या कठोर निर्बंधांच्या काळात हळदी समारंभ, विवाह सोहळे, बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीस, पालिका, वाहतूक पोलिसांनी घेतली होती. चोरून असे कार्यक्रम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. दोन महिन्यांच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या, मुखपट्टी न घालणाऱ्या ५ हजारांहून अधिक लोकांकडून २३ लाखांचा दंड वसूल केला आहे. कल्याण-डोंबिवलीत दररोज सध्या ८० ते ९० करोनाबाधित रुग्ण आढळून येत असले तरी त्याच्या दुप्पट रुग्ण उपचार घेऊन दररोज घरी जात आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांची संख्या एक हजार ३९९ आहे. उपचार घेऊन सुखरूप घरी गेलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३० हजार ९१६ आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या सध्या कल्याण पश्चिमेत आढळून येते.