दीड महिन्यात ६६६ जणांचा मृत्यू; दररोज सरासरी ३५ बळींची नोंद

ठाणे : गेल्या जवळपास दीड महिन्यापासून रोज नवनवे उच्चांक नोंदवणारा ठाणे जिल्ह्यातील दैनंदिन करोनारुग्णांचा आकडा आता स्थिर होऊ लागला आहे. सध्या जिल्ह्यात दररोज सरासरी पाच हजार रुग्ण आढळून येत असले तरी आठवडाभरापूर्वीपर्यंत ही संख्या आठ हजारांच्या आसपास होती. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. परंतु, त्याचवेळी दररोज नोंदवल्या जाणाऱ्या मृत्यूंचा आकडा सरासरी ३० ते ३५च्या आसपास आहे. परिणामी आता प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेसमोर मृत्युदर कमी करण्याचे आव्हान आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गेल्या दीड महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. करोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्यामुळे रुग्णलयांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाहीत. पालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पालिका आणि खासगी रुग्णालयांना प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये व्होल्टास, पार्किंग प्लाझा, कळवा आणि मुंब्रा भागातील करोना रुग्णालयांची अशीच काहीशी अवस्था असून प्राणवायू पुरवठय़ाअभावी ही रुग्णालये बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. असे असले तरी, दुसरीकडे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आणि पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्य़ात दिवसेंदिवस करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्य़ात आठ दिवसांपूर्वी दररोज सरासरी ६ हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. मात्र, त्यानंतर रुग्ण संख्येत घट होऊन ती पाच हजारांवर आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून दररोज पाच हजार रुग्ण आढळून येत आहेत. चाचण्या वाढूनदेखील रुग्णसंख्या स्थिर असल्याने करोनाचा प्रसार कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दीड महिन्यांपूर्वी दररोज सरासरी ५ हजारांच्या आसपास करोना चाचण्या केल्या जात होत्या आणि त्यामध्ये १३० च्या आसपास रुग्ण आढळत होते.

आता शहरात दररोज सरासरी १० ते १३ हजारांच्या आसपास चाचण्या होत असून त्यामध्ये १४०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. चाचण्या वाढल्या तरी शहरात रुग्ण आढळून येण्याचा आकडा मात्र स्थिर असल्याचे चित्र आहे.

 

दीड महिन्यातील शहरनिहाय मृत्यू

शहर      मृत्यू संख्या

ठाणे               १६५

कल्याण- डोंबिवली ११९

नवी मुंबई               १४८

उल्हासनगर             २६

भिवंडी                      २२

मीरा भाईंदर             ११२

अंबरनाथ                   २७

बदलापूर                     ६

ठाणे ग्रामीण            ४१

एकूण                    ६६६

शहरनिहाय करोना चाचण्या

शहर                          दीड महिन्यापूर्वी                     आता

ठाणे                           ५ ते ६ हजार                   १० ते १३ हजार

कल्याण -डोंबिवली       १७०० ते १८००                 ३५००

भिवंडी                          १०० ते १५०                   ७०० ते ८००

उल्हासनगर                  ४०० ते ४५०                   ४०० ते ४५०

अंबरनाथ                       ३०० ते ३५०                 ३०० ते ३५०

बदलापूर                         ३०० ते ३५०                ३०० ते ३५०

ठाणे ग्रामीण                 २५० ते ३००                    ३०० ते ३५०