लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. विवाह सोहळ्याच्या ठिकाणी फक्त ५० वऱ्हाडींना परवानगी असताना कल्याण पूर्वेत ६० फुटी रस्त्यावरील गॅस कंपनीशेजारील मैदानात बुधवारी संध्याकाळी चिंचपाडा येथील रहिवाशाने भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. ७०० हून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते. उपस्थितांच्या तोंडावर मुखपट्टी नव्हती. करोना संसर्गाचे नियम पायदळी तुडवून विवाह सोहळा आयोजित केल्याने ड प्रभाग कार्यालयाने या सोहळ्याच्या आयोजकांवर बुधवारी रात्री कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले.

करोनाची वाढ चिंताजनक असल्याने गुरुवारपासून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत विवाह सोहळे सार्वजनिक आयोजित करायचे असल्यास यजमानांना पोलीस ठाणे, स्थानिक प्रभाग अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. विवाह सोहळ्यात करोना संसर्गाचे सर्व नियम पाळले जातील याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. त्यानंतरच अशा सोहळ्यांना परवानगी देण्याचे कठोर र्निबध आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घातले आहेत. त्यामुळे डामडौलात विवाह सोहळा करण्यासाठी उत्सुक असलेली मंडळी नाराज झाली आहेत.

कल्याण पूर्वेतील गॅस कंपनीजवळील मैदानावर चिंचपाडा येथील रहिवासी राजेश यशवंत म्हात्रे यांची मुलगी दक्षता हिचा विवाह ठाण्यातील कासारवडवली येथील महेश कृष्णा राऊत यांचा मुलगा नीलेश याच्याबरोबर पार पडत होता. वधू-वर पक्षांकडून सार्वजनिक ठिकाणी भव्य विवाह सोहळा बुधवारी रात्री आयोजित केला होता. या सोहळ्याची माहिती ड प्रभाग अधिकारी वसंत भोंगाडे, अधीक्षक संजय कुमावत, सतीश रहाटे, रुपेश पाटील, दीपक शेलार यांना समजताच त्यांनी पालिका पथकासह तेथे धाड घातली. त्यावेळी विवाह सोहळ्यात ७०० हून वऱ्हाडी सहभागी झाले होते. एकाही वऱ्हाडीच्या तोंडावर मुखपट्टी नव्हती. अंतरसोवळे पाळले जात नव्हते. जंतुनाशक हातधुणी व्यवस्था मंडपाच्या प्रवेशद्वारात नव्हती. या सोहळ्यासाठी पालिका, पोलिसांची यजमानांनी परवानगी घेतली नव्हती. करोना संसर्गाचे सर्व नियम धुडकावून विवाह सोहळा सुरू असल्याचे दिसताच प्रभाग अधिकारी भोंगाडे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन लिपिक दीपक शेलार यांच्यातर्फे आयोजक राजेश म्हात्रे, महेश राऊत यांच्यावर साथरोग, आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.