संपूर्ण ठाणे जिल्ह्यात बाजारपेठांत शुकशुकाट; राज्य सरकारच्या आदेशांची अमलबजावणी

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच महापालिका आणि पोलीस प्रशासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच शहरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी दुकाने बंद ठेवली, तर काही ठिकाणी सुरू असलेली दुकाने पोलिसांनी बंद केली. सर्वच शहरांतील रस्त्यांवर नेहमीपेक्षा वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ कमी होती तर काही रस्त्यांवर शुकशुकाट होता.

ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या रेल्वे स्थानक परिसर, नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड, मुख्य बाजारपेठ या भागातील १०० टक्के दुकाने बंद होती. तसेच या भागातील रस्त्यांवर वाहनांची संख्याही कमी होती. शहराच्या अन्य परिसरांमध्येही असेच काहीसे चित्र होते. घोडबंदर परिसरात काही ठिकाणी दुकाने मात्र सुरू होती. त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन ती दुकाने बंद केली. सॅटीस पुलावरील टीएमटी थांब्यावर तर पुलाखाली असलेल्या रिक्षा थांब्यांवर प्रवाशांच्या रांगा दिसत नव्हत्या. तसेच टीएमटी बसगाडय़ांमध्येही प्रवाशांची संख्या कमी होती. ठाणे आणि मुंबई शहरांच्या वेशीवरील आनंदनगर टोलनाक्यावरून दररोज तीन लाखाहून अधिक वाहने वाहतूक करतात. मात्र, त्या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून १५ ते २० हजार वाहने वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे.

भिवंडी परिसरात मोठय़ा प्रमाणात हातमाग आणि यंत्रमाग कारखाने, फर्निचर दुकाने आणि गोदामे असून या सर्वच आस्थापना शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरातील रस्त्यांवर रिक्षांची वर्दळ कमी होती आणि एका रिक्षातून केवळ तीन प्रवाशांची वाहतूक करीत होते. शुक्रवारी भिवंडीतील मशीदमध्ये नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने एकत्र येतात. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन भिवंडीचे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी केले होते. त्यास अनेक मुस्लीम बांधवांनी प्रतिसाद देत नमाज पठणासाठी होणारी गर्दी टाळली.

मद्यविक्रेत्यांची मनमानी

उल्हासनगर महापालिकेने शहरातील सर्व व्यापारी संघटनांना बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यास उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. शहरातील फॉरवर लाइन आणि न्यायालय परिसरातील सुरू असलेल्या मद्याच्या दुकानात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्वत: त्या ठिकाणी धाड टाकून दुकान बंद करण्याचे आदेश दिले. या कारवाईची माहिती वाइन शॉप असोसिएशनच्या सदस्यांना मिळताच त्यांनी सर्व मद्याची दुकाने बंद केली. त्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूरमधील व्यापाऱ्यांनीही मद्याची दुकाने बंद केली. बदलापुरातही सकाळपासूनच दुकाने बंद होती. सकाळच्या सुमारास मुरबाड आणि अंबरनाथच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बदलापूर भाजी मंडईत गर्दी केली होती. मात्र इतर दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाला सहकार्य केले. अंबरनाथमध्येही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या रिक्षा दुपारनंतर बंद करण्यात आल्या.

कल्याण, डोंबिवलीत शुकशुकाट

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी दुकाने बंद ठेवली होती. दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला दुकाने वगळता सर्व बाजारपेठा बंद होत्या. रस्त्यावर तुरळक गर्दी होती. पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांची पथके शहराच्या विविध भागांत फिरून दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्याला दुकान बंद करण्याच्या सूचना देत होती. रेल्वे स्थानक भागातील रिक्षा वाहनतळांवर नेहमीपेक्षा तुरळक गर्दी होती.   कल्याणमधील टिळक चौकात एका खासगी शिकवणी चालकाने पुढील दार बंद ठेवून मागच्या दाराने विद्यार्थ्यांना आत घेऊन शिकवणी वर्ग सुरू केले होते. जागरूक नागरिकांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन शिकवणीचालकाला वर्ग बंद करण्यास भाग पाडले.

आज, उद्या हॉटेले बंद

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे शहरातील हॉटेल शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल असोसिएशन ऑफ ठाणे या संघटनेनेने शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला.  सोमवारी मार्गदर्शक सूचना आल्यानंतर हॉटेल खुली करण्यात येतील, असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

शेअर रिक्षांवर बंदी

ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात शेअर पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या रिक्षा, ओला, उबर आणि ग्रामीण भागातील काळ्या-पिवळ्या जीपची वाहतूक ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी दिले आहेत.रिक्षामधून कुटुंब किंवा स्वतंत्र प्रवासी वाहतूक करण्यास मात्र कोणतीही बंदी घातली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुकानदारांना सूचना

हॉटेलांमधून घरपोच जेवण पोहोचविण्याची सुविधा सुरू राहणार असून त्याचबरोबर किराणा मालाची दुकाने, औषधालय, दूध, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी स्वच्छता ठेवावी तसेच नागरिकांकरिता हँडवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.