दत्तात्रय भरोदे
एका नवजात अर्भकाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने शहापूर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. अविनाश बढिये यांचे दीपस्मृती रुग्णालय तालुका आरोग्य विभागाकडून सील करण्यात आले आहे. तालुक्यातील अंबर्जे येथील एका महिलेची दोन दिवसापूर्वी शहापुरच्या दिपस्मृती या रुग्णालयात प्रसूती झाली. बाळाचे वजन खूपच कमी असल्याने त्याला मुंबईच्या वाडिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे या नवजात अर्भकाची करोना चाचणी करण्यात आली असता पॉझिटिव्ह आली.

त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरूलता धानके यांनी डॉ. बढिये यांचे रुग्णालय सील करण्याचे आदेश दिले. प्रसूत महिलेची देखील करोना चाचणी केली असून त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. दरम्यान, याआधी देखील शहापुरातील सिद्धिविनायक व प्रणव हॉस्पिटल आणि डॉ. वेखंडे यांचे दवाखाने बंद ठेवण्यात आले होते. शहापूरसह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असून सध्या वासिंद, अल्याणी, कसारा, शेलवली(बां), धसई आदी ठिकाणी ३२ रुग्ण आढळून आले आहेत.