वसईत २५ दिवसांच्या तान्हुलीच्या हत्येने खळबळ उडाली होती. घरातून तिचे अपहरण करून विहिरीत तिचा मृतदेह टाकण्यात आला होता. तिची हत्या कुणी केली आणि का केली गेली, हे एक मोठे गूढ होते. मात्र, उशीचा अभ्रा (कव्हर) आणि दाराची कडी या दुव्यांच्या आधारे या प्रकरणाला नाटय़मय कलाटणी मिळाली. समोर आलेलं सत्य धक्कादायक होतं..

२६ फेबुवारी २०१६. वसईत राहणारी प्रिया चव्हाण पहाटे झोपेतून उठली आणि पाळण्यात झोपलेल्या तिच्या चिमुकलीला बघण्यास गेली. तिची चिमुकली परी अवघ्या २५ दिवसांची होती. रात्री परीला पाळण्यात झोपवून प्रिया शेजारच्या कॉटवर पती नितीनसह झोपली होती. पाळण्याकडे जाताच प्रियाच्या पोटात धस्स झालं. पाळण्यात परी नव्हती. प्रिया कावरीबावरी झाली. तिने पती नितीनला उठवलं. पाळण्यातलं बाळ गायब झाल्याचं समजताच तोदेखील हादरला. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. इवल्याशा परीला नेलं कुणी, हे कळायला मार्ग नव्हता. भेदरलेल्या चव्हाण दाम्पत्याने तात्काळ वालीव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू झाला.

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

नितीन चव्हाण (३०) हा रिक्षाचालक होता तर त्याची पत्नी प्रिया (२५) गृहिणी होती. हे दोघे वसई पूर्वेच्या वालीव येथील नवजीवन परिसरातील एका चाळीत राहत होते. नितीनची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे खंडणीसाठी कुणी परीचे अपहरण करण्याची शक्यता धूसर होती. घरात बळजबरीने प्रवेश झालेला नव्हता. चाळीत सीसीटीव्ही नसल्याने कुणी प्रवेश केला ते समजत नव्हतं. रात्रीच्या अंधारात हा गुन्हा घडला होता. त्यामुळे कुणी माहीतगार असावा अशी पोलिसांना शक्यता होती. नितीन आणि प्रियाच्या जवळच्याच कुणीतरी व्यक्तीने हे अपहरण केल्याच्या निष्कर्षांप्रत पोलीस येत होते. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्याकडे हा तपास सोपविला.

‘परीला शोधून आणू’ असा धीर पोलीस चव्हाण दाम्पत्याला देत होते. पण त्याच दिवशी संध्याकाळी अशी घटना उघड झाली की चव्हाण कुटुंबीयच नव्हे तर पोलीसही हादरून गेले. त्या दिवशी सायंकाळी गावातील विहिरीवर एक महिला पाणी भरत असताना तिची बादली विहिरीत पडली. ती काढण्यासाठी तिने दोरीला हुक लावून ती खाली सोडली. पण बादलीऐवजी वेगळंच काही तरी हुकला अडकलं. या महिलेने ती वस्तू वर खेचताच ते दृश्य पाहून तिच्या जिवाचा थरकाप उडाला. कपडय़ात गुंडाळलेली ती वस्तू निष्प्राण परीचा मृतदेह होता. कुणी तरी परीला विहिरीत टाकून मारून टाकलं होतं. परीचा निपचित पडलेला देह पाहून पोलिसांचे मनही गहिवरले.

बेपत्ता परीचा मृतदेह सापडल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला. पण काही दुवा मिळत नव्हता. दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की नितीनचं यापूर्वी सुजाता नावाच्या महिलेशी लग्न झालेलं होतं. सुजाता (नाव बदललेलं) आणि नितीनचा न्यायालयात पोटगीवरून वाद सुरू होता. सुजाता याच भागात राहत होती. तिला सोडून नितीनने प्रियाशी लग्न केलं होतं. त्यामुळे तिचा नितीनवर राग होता. बाकी नितीनचं कुणाशी वैर नव्हतं. सुजाता याच भागात राहात असल्याने नितीनचं घर, या भागातली विहीर आदींबाबत तिला माहिती होती. नितीनच्या घरात ती वावरली असल्याने घरात कसा प्रवेश करायचा याची तिला माहिती होती. बाळाला पळवून विहिरीत टाकून पुन्हा घरी परतणं तिला शक्य होतं. नितीननेही सुजातावर संशय व्यक्त केला होता. सारे पुरावे सुजाताच्या विरोधात होते. त्यामुळे या प्रकरणाचा सुजाताच्या अटकेनंतर उलगडा होईल, असे पोलिसांना वाटू लागले.

पोलिसांनी सुजाताकडे चौकशी केली. तिला ताब्यात घेतले. पण ती काहीच बोलायला तयार नव्हती. गुन्हेगार कितीही निर्ढावलेला असला तरी पोलिसांसमोर त्याला सत्या बोलायलाच लागते. पण सुजाताच्या बाबतीत असे घडत नसल्याने ती निदरेष असल्याचे पोलिसांना वाटू लागले. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी मग वेगळ्या दिशेने तपास करण्यासाठी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेहासोबत काय सापडलं ते पुन्हा एकदा तपासलं. पण हाती निराशा आली. तेवढय़ात पोलिसांचं लक्ष उशीच्या अभ्य्रावर गेलं. याच अभ्रात गुंडाळून परीला विहिरीत फेकण्यात आलं होतं. हाच उशीचा अभ्रा (कव्हर) आपल्याला गुन्हेगारापर्यंत नेईल, अशी पोलिसांना खात्री पटली.

पोलिसांनी सुजाताच्या घराची झडती घेतली. पण तिच्या घरात या अभ्य्राची दुसरी जोड नव्हती. मग प्रियाला अभ्रा ओळखण्यासाठी बोलावलं. तो उशीचा अभ्रा तिच्याच घराचा होता. तिने घरातून दुसरी जोडी आणून दाखवली. तपासाचा रोख बदलला. अभ्य्राने पोलिसांना मोठा दुवा दिला होता. बाळ पळवणाऱ्या व्यक्तीने घरातील उशीचा अभ्रा काढून त्यात बाळाला गुंडाळलं होतं. कोण असू शकेल ती व्यक्ती? बाहेरची की घरातली? पोलिसांनी प्रत्येकाची चौकशी सुरू केली. त्यांचा पहिला संशय नितीनवर गेला. त्यांनी नितीनकडे पुन्हा चौकशी केली. पण त्याने सांगितलं ज्याने बाळ पळवलं त्याने उशीच्या अभ्य्रात लपेटून नेलं असावं. पोलिसांचा पेच वाढला मग दाराच्या कडीवर लक्ष गेलं. दररोज रात्री नितीन दाराला कडी लावत होता. पण अपहरणाच्या रात्री दाराला कडी लावली गेली नव्हती. म्हणजे कुणीतरी बाहेरील व्यक्ती घरात आली असं भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांना या गोष्टी पुरेशा होत्या. त्यांनी लगेच नितीनला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हय़ाची कबुली दिली.  नितीन आणि सुजाताचा कोर्टात पोटगीसाठी खटला सुरू होता. हा खटला अंतिम टप्प्यात होता आणि नितीनला पोटगी द्यावी लागणार होती. त्यामुळे सुजाताला अडकविण्यासाठी नितीनने अघोरी कट रचला, स्वत:च्याच तान्हुल्या मुलीचे अपहरण करून त्याने विहिरीत टाकले. हा आळ सुजातावर येईल आणि ती अडकेल आणि पोटगीतून सुटका होईल असे त्याला वाटले होते. कुणीतरी घरात शिरून बाळाला उचलून नेले हे दाखविण्यासाठी त्याने २५ फेब्रुवारीच्या रात्री दाराला आतून कडीच लावली नव्हती. नितीनने पद्धतशीरपणे ही योजना आखली. पहिल्या पत्नीला धडा शिकविण्यासाठी त्याने स्वत:च्याच मुलीचा बळी दिला होता. हे सत्य मन हादरवून टाकणारं होतं. कुणी या थरालाही घसरू शकतं, याचा पोलीसही विचार करू शकत नव्हते. पण अनेकदा असं घडतं. मनुष्य सूडभावनेने किंवा एखाद्याला ‘धडा’ शिकवण्याच्या भावनेतून आंधळा होतो. अशा वेळी लहान मुले हे सूड घेण्यासाठी सहजसोपी सावज ठरतात. पण नितीनने तर पोटच्या मुलीलाच सावज बनवून क्रूरतेची सीमाच ओलांडून टाकली.