हजारोंच्या संख्येने खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर; अंतर नियमाचे उल्लंघन

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने टाळेबंदीचे आदेश दिले असून उत्सव साधेपणाने आणि घरातच साजरे करण्याचे आवाहन केले होते. असे असतानाही मुंब्रा शहरात हजारो नागरिक रमजान ईदनिमित्ताने खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते. पोलीस आणि पालिका प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळामुळे बघ्याची भूमिका घ्यावी लागल्याचे चित्र होते. त्यामुळे या गर्दीत एखादा करोनाबाधित रुग्ण आढळून शहरात पुन्हा करोना वाढल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

मुंब्रा शहरात मोठय़ा प्रमाणात मुस्लीम धर्मीय राहतात. रमजान ईदनिमित्ताने बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी मुंब्रा शहरात ठिकठिकाणी खाद्यपदार्थ, कपडे तसेच वस्तू विक्रीची दुकाने रस्त्याकडेला थाटण्यात आली होती. त्यामुळे खरेदीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते. विक्रेते आणि खरेदीदारांपैकी अनेकांच्या चेहऱ्यावर मुखपट्टीही नव्हती. तर काहींची मुखपट्टी हनुवटीवर होती. अंतर नियमाचेही या वेळी उल्लंघन झाल्याचे चित्र होते. असे असतानाही पोलीस आणि महापालिका प्रशासन मनुष्यबळाअभावी फक्त बघ्याची भूमिका घेत होते. मुंब्रा शहरातही दिवसाला सरासरी १० ते १२ रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णवाढीचा आलेख घसरत असताना रमजान ईदनिमित्ताने नागरिकांनी गर्दी केल्याने करोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रमजान ईदनिमित्ताने गर्दी टाळण्यासाठी मुंब्रा शहरात १५० पोलीस कर्मचारी आणि २४ अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

– मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे.