डोंबिवली, ठाणे, दादर येथील केंद्रांवर ग्राहकांना घरपोच भाजी पोहचवण्याची व्यवस्था

शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हरतऱ्हेचा भाजीपाला थेट नागरिकांना दुकानात उपलब्ध व्हावा, घरपोच देता यावा. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे थेट त्यांच्या तिजोरीत पडावेत, या उद्देशातून डोंबिवलीतील ‘नवउद्यमी’ तरुणांच्या एका गटाने रास्त दर भाजी विक्री केंद्र डोंबिवलीत सुरू केले आहे. या भाजी केंद्राला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डोंबिवलीतील अनेक ग्राहकांनी घरपोच भाजीपुरवठा सेवा देण्याची मागणी केल्याने, ग्राहकांना घरपोच भाजी पोहचविण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

‘शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड’ या शीर्षकाखाली या नवउद्यमी तरुणांनी रास्त दर भाजी विक्री केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांने शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला त्याने निश्चित करून दिलेल्या दराने खरेदी करायचा. तो थेट शहरी भागात आणून रहिवाशांना विकायचा, हे या तरुणांचे उद्दिष्ट आहे. शहरांमध्ये विकत असलेला बहुतेक भाजीपाला रेल्वे, गटारांच्या कडेला पिकवण्यात येतो. त्यात शरीराला हानिकारक घटक असतात. त्यामुळे शरीराला व्याधींचे प्रमाण वाढत आहे. हे टाळण्यासाठी डोंबिवलीतील शेतीशास्त्र व विक्रीचे अभ्यासक नीलेश काळे, शिल्पा कशेळकर, समीर आठवले, अनिता पगारे (नाशिक) यांच्या गटाने शेतामधील भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा गट जुन्नरहून भाजीपाला आणत होता. आता नाशिक येथील उगांव भागातील शेतकऱ्यांचा भाजीपाला दर दिवसाआड डोंबिवली, ठाणे आणि दादर केंद्रावर आणला जातो.

केंद्र सुरू झाल्यापासून मी येथून भाजी खरेदी करीत आहे. या केंद्रातील कोणतीही भाजी घ्या, भाजीची चव वेगळी आहे. त्यामुळे आता येथली भाजी नसेल तर बाजारात भाजी घ्यावीशी वाटत नाही. वजनकाटा तंतोतंत असतो, दराच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही. ही भाजी घरी नेल्यानंतर चार ते पाच दिवस राहिली तरी त्याला काही होत नाही.

-अनघा चांदोरकर, ग्राहक

भाजी विक्री केंद्र

डोंबिवली पूर्वेतील रामनगरमधील बोडस सभागृहाजवळ, कोटक महिंद्र बँकेच्या समोर एका गाळ्यात हे रास्त भाजीपाला केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र सात दिवस सुरू असते. ठाण्यात पश्चिमेतील विष्णूनगरमधील गजानन वडापावसमोर, दादर येथे गोखले रस्त्यावर पेडणेकर ज्वेलर्ससमोर केंद्र आहे. ठाणे, दादरमधील केंद्रे सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी चालवली जात आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवरून मागणी

ग्राहकाने आपला व्हॉट्सअप क्रमांक भाजी विक्री केंद्रावर दिल्यानंतर तो केंद्राच्या व्हॉट्स गटात समावेश केला जातो. त्यानंतर ग्राहकाने दररोज भाजी केंद्रावर भ्रमणध्वनीद्वारे संपर्क न करता, आपल्याला आज कोणती भाजी हवी आहे, ती कितो किलो हवी आहे. याची माहिती व्हॉट्सअपवरून देतात. त्या संदेशाची तात्काळ दखल केंद्रातील कर्मचारी घेतात.