दादोजी कोंडदेव क्रीडासंकुलात सरावातील अडथळे दूर; अन्यत्रही सुविधा देणार

ठाणे : ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडासंकुलात अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारांच्या सरावात येणारे अडथळे दूर करण्यात येतील, असे आश्वासन सोमवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळाडूंच्या पालकांना दिले. अ‍ॅथलिट्ससाठी क्रीडांगण खुले करण्यात येईल, पालिकेच्या खुल्या भूखंडांवर सरावासाठी सुविधा देण्यात येतील, असेही आयुक्तांनी सांगितले.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडांगणात रणजीकरिता खेळपट्टीची कामे सुरू असल्याने अ‍ॅथलेटिक्सच्या खेळाडूंना पायऱ्यांवर सराव करावा लागत होता. परिणामी अनेक खेळाडूंना गंभीर दुखापती झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. नुकतेच तिथे सेलिब्रीटी क्रिकेट सामने झाले, तेव्हा धावपटूंना मैदानात सराव करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे धावपटूंच्या पालकांनी शुक्रवारी सामन्यांदरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती. यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी खेळाडूंच्या पालकांसमवेत बैठक आयोजित केली होती.

दादोजी कोंडदेव क्रीडांसुकलात खेळाडूंना उत्तम धावपट्टी तयार करून देणे, पालिकेच्या राखीव भूखंडांवर धावपट्टी तयार करणे, सरावाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणे इत्यादी मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन पालकांना देण्यात आले. आजपासून अथलेटिक्स खेळाडूंना विनाअडथळा सराव करण्यास परवानगी देण्यात यावी, असेही आदेश आयुक्तांनी क्रीडा प्रशासनाला दिला. कौसा येथील क्रीडांगणात अस्वच्छता असून धावपटूंना तिथे जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. ठाण्यातील क्रीडांगणेही अ‍ॅथलेटिक्स करिता अपुरी आहेत, असे पालकांनी आयुक्तांना सांगितले. यावर आयुक्तांनी शहरातील कळवा, कासारवडली, हिरानंदानी इस्टेट येथील महापालिकेच्या राखीव भूखंडावर अ‍ॅथलेटिक्ससाठी क्रीडांगणे विकसित करण्यात येतील असे आश्वासन दिले.  दादोजी कोंडदेव स्टेडियम ते कौसा क्रीडांगण मार्गावर खेळाडूंना मोफत बससेवा देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना या सर्व राखीव जागांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. तात्पुरत्या स्वरूपावर खेळाडूंना दादोजी कोंडदेव कड्रांगणातील सीमा रेषेच्या बाहेर सराव करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आसनांच्या भागात धावताना अडथळा ठरणाऱ्या लोखंडी जाळ्याही काढण्याचे आदेश आयुक्तांनी क्रीडा प्रशासनाला दिले आहेत.

धावपटूंसाठी सुविधा

* दादोजी कोंडदेव क्रीडांगणात अर्धवट बांधलेली दीडशे मीटरची सिंथेटिक धावपट्टी ४०० मीटपर्यंत बांधून पूर्ण करणार.

*  दादोजी कोंडदेव क्रीडांगण ते कौसा क्रीडांगण मार्गावर महापालिका अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंसाठी विशेष मोफत बस देणार.

*  साकेत येथील पोलीस मैदानावर अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंना सामान ठेवण्यासाठी कंटेनर उभारणार, विश्रांतीसाठी शेड, मैदानावर पाणी फवारण्यासाठी टँकर, स्वच्छतागृह इत्यादी सुविधा पुरवणार.

*  कौसा येथे स्वच्छतागृहांची दुरुस्ती, अद्ययावत धावपट्टी तयार करणार. सुरक्षाव्यवस्थाही पुरवणार.