News Flash

अपघातप्रवण क्षेत्रांत घट

ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात अपघातप्रवण क्षेत्रांत घट नोंदविण्यात आली आहे. २०२०पर्यंत या भागांत ५७ अपघातप्रवण क्षेत्रे होती.

वर्षभरात २१ने कमी; वाहतूक पोलीस, विविध प्राधिकरणांच्या उपाययोजनांचा परिणाम

किशोर कोकणे

ठाणे : ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात अपघातप्रवण क्षेत्रांत घट नोंदविण्यात आली आहे. २०२०पर्यंत या भागांत ५७ अपघातप्रवण क्षेत्रे होती. २०२१मध्ये हे प्रमाण २१ने घटले आहे. वाहतूक पोलीस आणि विविध प्राधिकरणांकडून उपाययोजना केल्या जात असल्याने अपघातप्रवण क्षेत्रे घटल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. घट झालेल्या अपघातप्रवण क्षेत्रांत घोडबंदर रोड येथील आठ, भिवंडीमध्ये दहा आणि कळवा, मुंब्रा, डोंबिवली भागातील तीन रस्त्यांचा समावेश आहे. या वर्षी कौसा टोलनाका येथे एका नव्या अपघातप्रवण क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे.

एकाच ठिकाणी तीन वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्या जागेला वाहतूक पोलिसांकडून अपघातप्रवण क्षेत्र घोषित केले जाते. २०१८ मध्ये ठाणे पोलिसांनी अशाचप्रकारे अपघातप्रवण क्षेत्रांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरांत ५७ अपघातप्रवण क्षेत्रांची नोंदी होती. त्यापैकी भिवंडी शहरात २२, घोडबंदर १३, कळवा-मुंब्रा आठ, कल्याण-डोंबिवली आठ, कोपरी, नौपाडा, माजीवडा येथे चार आणि अंबरनाथ येथील रस्त्यांवर दोन अपघातप्रवण क्षेत्रांचा समावेश होता. त्यामुळे या भागात अपघातांमध्ये घट करण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच विविध प्राधिकरणांकडून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली होती. रस्त्याकडेला दिशादर्शक, वाहनांचा वेग कमी करण्याचे फलक, गतिरोधक बसविणे, महामार्गाच्या ठिकाणी अपघाती वळण बंद करण्याच्या उपाययोजनांचा समावेश होता. २१ क्षेत्रांत अपघातांमध्ये तीन वर्षांत पाचहून कमी जणांचा मृत्यू झाला, तर काही ठिकाणी अपघातांचे प्रमाण एक किंवा दोन असे होते.

घोडबंदरमध्ये आठ क्षेत्रांची घट गेल्या काही वर्षांपासून कापूरबावडी ते ब्रह्मांड भागात सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. तसेच घोडबंदर मार्गावरील उड्डाण पुलांची दुरुस्ती, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर पांढरे पट्टे आखणे त्यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण कमी झालेले आहे. घोडबंदर येथील १३ पैकी आठ क्षेत्र अपघातप्रवण क्षेत्रांतून वगळण्यात आले आहेत. हे रस्ते आता अपघातप्रवण क्षेत्र नाही..

  • भिवंडी- बागेफिरदोस पूल ते नदीनाका, धामणकरनाका ते सोमा मशीद, राजीव गांधी पूल, रांजनोली ते पिंपळास, दापोडा रोड-कृष्णा कॉम्प्लेक्स, कशेळी टोलनाका, दिवा पेट्रोल पंप, ओवळा गाव, अरुण कुमार कावरी मार्ग, आर.सी. पाटील चौक.
  • घोडबंदर- गायमुख ते गायमुख खाडी, नागला बंदर ते भाईंदरपाडा, ओवळा,
  • आनंदनगर ते विजय गार्डन सिग्नल, वाघबीळ ते डोंगरीपाडा, पातलीपाडा ते ब्रह्मांड, चितळसर मानपाडा ते दोस्ती, आरमॉल ते तत्त्वज्ञान विद्यापीठ.
  • कळवा, मुंब्रा- छत्रपती शिवाजी महाराज चौक, गॅमन नाका.
  • डोंबिवली- डोंबिवली चार रस्ता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 1:55 am

Web Title: decrease in accident prone areas ssh 93 2
Next Stories
1 उल्हास नदीवरील जलपर्णीचा विळखा सैल
2 ठाण्यात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची मागणी
3 बदलापुरात वायू गळतीने खळबळ
Just Now!
X