केंद्रे वाढल्यामुळे गर्दीचे विभाजन

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे वाढविण्यात आली असून यांमुळे याठिकाणी पूर्वीसारखी उसळणारी गर्दी ओसरली आहे. तसेच पालिका हद्दीतील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण बंद आहे. कोविशिल्ड लस घेतलेल्या लाभार्थींना ८४ दिवसांनंतर दुसरी मात्रा घ्यावी लागणार असल्याने त्या प्रतीक्षेत अनेक लाभार्थी आहेत. त्यामुळे केंद्रांवरील गर्दीत घट झाली आहे, असे लसीकरण केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाकडून कल्याण-डोंबिवली पालिकेला नियमित १० ते १४ हजारांपर्यंत करोना लशीच्या कुप्या मिळतात. लशींच्या प्रमाणात पुरेसे लाभार्थी लस घेण्यासाठी केंद्रावर येत नाहीत. लशीचा साठा पडून राहण्यापेक्षा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या वरिष्ठांशी बोलणी करून कडोंमपा हद्दीतील १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची मागणी होत आहे. लस घेण्यासाठी रहिवाशांची यापूर्वी धावपळ असायची. राजकीय पक्षांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर आदल्या दिवशी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मिळणारे टोकन घेण्यासाठी झुंबड उडायची. आता राजकीय पक्ष कार्यालयातही टोकन घेण्यासाठी येणाऱ्या  रहिवाशांची गर्दी ओसरली आहे.

पालिका हद्दीत लसीकरण केंद्रांची संख्या आता २१ करण्यात आली आहे. आरोग्य सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ, वृद्ध यांनी लशीच्या पहिल्या, काहींनी दुसऱ्या मात्रा घेतल्या आहेत. कोविशिल्ड लशीच्या दुसऱ्या मात्रेची मर्यादा ८४ दिवसांनी वाढविल्याने अनेकजण दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत.

‘लसीकरण केंद्रावर लाभार्थी असले की काम करायला उत्साह असायचा. आता लाभार्थींची प्रतीक्षा करावी लागते. अर्धा ते एक तासाच्या अंतराने पाच ते १० लाभार्थी लस घेण्यासाठी येतात. दुपारनंतर कोणीही लाभार्थी केंद्राकडे फिरकत नाही. केवळ चौकशी करण्यासाठी येतात,’ असे केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी लस घेण्यासाठी उत्सुक आहेत. काही लाभार्थींनी मुंबईतील खासगी रुग्णालयात जाऊन सशुल्क लस घेण्याची तयारी केली आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेनेही खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील केंद्र सुरू झाली तर पालिका केंद्रांवरील भार कैकपटीने कमी होईल, असे कर्मचारी सांगतात. खासगी रुग्णालये लस मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. गृहनिर्माण संस्था, खासगी आस्थापना यांना खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून गट समूहाने लसीकरण करून घेण्याच्या तयारीत आहेत.

केंद्रावरील गर्दी ओसरण्याचे कारण

  •  कोविशिल्डची पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा घेण्यासाठी तीन महिने लाभार्थीला प्रतीक्षा करायची आहे.
  •  पहिली मात्रा घेतल्यानंतर करोना झाला तर पुन्हा तीन महिने प्रतीक्षा करून लस घ्यायची आहे.
  •  १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण बंद आहे.

करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लाभार्थींना गर्दीत उभे न राहता लस घेता यावी म्हणून पालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली. ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच स्वतंत्र केंदे्र सुरू केली आहेत. लस घेणाऱ्या लाभार्थींचे विभाजन झाले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली आहे. उपलब्ध लस साठा आणि केंद्रांची संख्या विचारात घेऊन १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे. शासनाकडून आदेश प्राप्त होताच या गटाचे लसीकरण सुरू करण्यात येईल. -डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी