पाच हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंसाठी कूपन

‘व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन संकेतस्थळावर खरेदीसाठी ४० ते ८० टक्क्यांपर्यंत सवलती देण्यात येत आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचा उत्साह वाढला आहे. १४ फेब्रुवारीला ग्राहकांनी अधिक खरेदी करावी यासाठी विविध खरेदी संकेतस्थळावर प्रत्येक तासाला खास ऑनलाइन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धासाठी पाच हजार रुपयांपर्यंतची भेटवस्तूंसाठीची कूपन देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये समाजमाध्यमांच्या वाढलेला प्रभावामुळे ‘व्हॅलेनटाइन डे’च्या शुभेच्छा समाजमाध्यमांवर संदेश पाठवून देण्यात येत असल्या तरी बाजारपेठेत खास भेटवस्तू आणि गुलाब खरेदी करण्यासाठी तरुणांची गर्दी कायम आहे. गुलाब खरेदी करतानाही ‘टॉप सिक्रेट’ आणि डच जातीच्या गुलाबांची मागणी वाढली असल्याचे फूलविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या प्रेमदिवसाच्या निमित्ताने तरुणांपासून वृद्धांपर्यंत भेटवस्तूंच्या दुकानात झुंबड उडाल्याचे पहायला मिळत आहे. बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असतानाच संकेतस्थळावर खरेदीसाठी ग्राहकांची स्पर्धा सुरु आहे. संकेतस्थळावर कपडे, भेटवस्तूंबरोबर फुलांची खरेदीही करण्यात येत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांवर तीस ते चाळीस टक्के सवलत देण्यात येत आहे.  वेगवेगळ्या रंगांच्या कागदात गुंडाळलेले आणि विशिष्ट पद्धतीने सजवलेले गुच्छ ऑनलाइन उपलब्ध आहेत. अगदी ७०० रुपयांपासून ते ४०,००० रुपयांपर्यंत या गुच्छांची किंमत आहे.

बाजारपेठेत टॉप सिक्रेट, डच गुलाब

‘व्हॅलेंटाईन्स डे’जवळ आल्याने बाजारपेठेतील गुलाब फुलांची आवाक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मात्र गुलाबांच्या फुलांचे दर हे दरवर्षीसारखेच असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. लाल रंग असणाऱ्या चायना जातीच्या २० गुलाबांचा  गुच्छाची किंमत ८० रुपये आहे तर गुलाबी रंगांच्या चायना जातीच्या २० गुलाबांच्या गुच्छाची किंमत ५० रुपये आहे. भारतीय जातीच्या ६ गुलाबांचा  गुच्छाची किंमत ३० रुपये आहे. एकंदरीतच १० ते १५ रुपयांपासून गुलाबांच्या गुणवत्तेनुसार गुलाबांची किंमत असते. टॉप सिक्रेट आणि डच यासारख्या जातीच्या गुलाबांची मागणी सध्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे, असे फुलविक्रेत्यांचे म्हणणे आहे.

एकत्रित भेटवस्तू

व्हॅलेंटाईन्स डे च्या आधी सात दिवस प्रपोज डे, चॉकलेट डे असे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. सध्या भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये या सातही दिवसाच्या वस्तू एकाच डब्ब्यात उपलब्ध होत आहेत. भेटवस्तूंचा या डब्ब्यामध्ये चॉकलेट, टेडी बेअर, गुलाब अशी सर्व वस्तू एकत्रितपणे मिळतात. तरूणांकडून या भेटवस्तूच्या डब्ब्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.