निसर्ग संवर्धन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. मेधा मुळगावकर यांना ‘प्रज्ञानंद’ पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले. तर कथ्थक गुरू डॉ. मंजिरी देव यांना कलानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वानंद संस्थेच्या वतीने देण्यात येणारा प्रज्ञानंद व कलानंद पुरस्कारांचे वितरण नुकतेच ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वानंद संस्थेच्या चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. भारतातील विविध नृत्यांच्या सादरीकरणामध्ये हा सोहळा पार पडला.        नृत्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वाती कोळ्ळे यांनी स्वानंद संस्थेची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून प्रज्ञानंद व कलानंद पुरस्कार देऊन वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. यंदाचा प्रज्ञानंद पुरस्कार बी. एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रमुख मेधा मुळगावकर यांना देण्यात आला. निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. तर डॉ. मंजिरी देव यांना कलानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे असलेल्या गायिका आशा खाडिलकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.