‘स्त्यावर मंडप उभारणार असाल, रात्रभर डीजे, ध्वनिक्षेपक लावून धांगडधिंगा करणार असाल तर आमच्याकडून यंदा वर्गणी मिळणार नाही,’ अशी रोखठोक उत्तरे घरी येणाऱ्या उत्सवी मंडळाच्या कार्यकर्त्यांना देण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे. डोंबिवली शहराच्या अनेक भागांत हा प्रकार सुरू आहे. अशी रोखठोक उत्तरे मिळताच कार्यकर्ते कोणताही प्रतिवाद न करता त्या दारासमोरून निमूटपणे निघून जाणे पसंत करतात, असा अनुभव काही नागरिकांनी कथन केला.
रस्त्यावर मंडप उभारणे, रात्रभर मंडपासमोर, मंडपाच्या मागे धिंगाणा करणे असे उद्योग उत्सवाच्या नावाखाली अनेक वर्षे शहर परिसरात सुरू आहेत. हा किळसवाणा प्रकार पाहून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. बोलणार कोण, असा प्रश्न असल्याने नागरिक मुकाटपणे हा प्रकार सहन करीत होते.
या वर्षी उच्च न्यायालयाने उत्सवी, धांगडधिंगा करून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना चाप लावला आहे. न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत उत्सव साजरे करण्याचे आदेश महापालिका, पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. उत्साही कार्यकर्त्यांसाठी उत्सव म्हणजे एक पर्वणी असते. श्रद्धेपेक्षा ही काही दिवसांची ‘पर्वणी’ यशस्वी कशी होईल, याकडेच कार्यकर्त्यांचे अधिक लक्ष होते.
न्यायालयाने या उत्सवांच्या माध्यमातून होणारी वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनाही आपल्याला या मंडळांना बोलण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. आपणही या उत्सवींच्या धिंगाण्यावर बोट ठेवू शकतो याची जाणीव झालेले जागरूक नागरिक आता दारावर वर्गणी मागण्यास येणाऱ्या उत्सवी कार्यकर्त्यांना ‘तुम्ही मंडप रस्त्यावर उभारून उत्सव साजरा करणार असाल तर आमच्याकडून एक पैशाची वर्गणी मिळणार नाही. कोठे आडबाजूला, कोपऱ्यात, मैदानात उत्सव करणार असाल तरच वर्गणी देतो,’ असे ठणकावून सांगत आहेत.
शहराच्या काही भागांत नागरिक अशा प्रकारचे प्रश्न कार्यकर्त्यांना विचारून मग वर्गणी देण्याचा निर्णय घेत आहेत. अनेक वर्षे आक्रमक, लवाजम्याने येणारे हे कार्यकर्ते अशी नागरिकांची ही आक्रमक उत्तरे पाहून चकार शब्द न काढता तेथून निघून जाणे पसंत करीत आहेत.
नागरिकांच्या बळावर कार्यकर्ते उत्सव साजरे करतात. वारेमाप पैसा मिळत असल्याने तो खर्च करण्यासाठी कार्यकर्ते वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करीत होते. त्यामधून नाचगाणी, धांगडधिंग्याचे प्रकार वाढत होते. उत्सवाच्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली तर त्याला राजकीय, धार्मिक रंग देऊन ते पोलिसांवर उलटवण्याचे प्रकार होत होते. बरे झाले न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याने आम्हाला आता उत्सवाच्या ठिकाणी धिंगाणा करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.डोंबिवलीत एका उत्सवासाठी प्रत्येक सदनिकेमागे सातशे ते आठशे रुपये काढण्यात येत होते. हजार ते बाराशे सदनिकांमधून जमा होणारी ही वर्गणी संबंधित उत्सवासाठी खर्च केली जात होती. एवढी जमा होत असलेली वर्गणी बघून काहींनी हा उत्सव आपल्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली केल्या. या उत्सवाच्या ठिकाणी पैशाचा पाऊस पाडला जात होता. या उधळपट्टीवरून मंडळात गट-तट पडले. उत्सवावरून राजकारण सुरू झाले. अखेर, काही जागरूक नागरिकांनी ‘पैसा देवासाठी देतो. तुमच्या पायाखाली तुडवण्यासाठी देत नाही. आमची लक्ष्मी आणि श्रद्धा तुम्ही पायाखाली तुडवण्यासाठी घेत असाल तर या वेळी एक पैशाची मदत मिळणार नाही,’ असे उत्सवी कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले. यामध्ये एका महिलेचा सक्रिय सहभाग होता, असे समजते.