पायऱ्यांवरूनच डोंबिवलीकरांची पायपीट

प्रवाशांच्या विशेषत: वृद्ध तसेच अपंग व्यक्तींच्या सोयीसाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेले सरकते जिने ऐन गर्दीच्या वेळेतच बंद ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सुविधेची गरज असलेल्या प्रवाशांना जुन्या जिन्यांप्रमाणे सरकत्या जिन्यांवरूनही चढ-उतार करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या जिन्यांच्या दुरुस्ती व देखभालीचे काम खासगी संस्थांना देण्यात आले असल्याने रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या या हालअपेष्टांची माहितीच नसल्याचेही स्पष्ट होत आहे.

वृद्ध, अपंग, लहान मुले यांना रेल्वे फलाटावर जाणे-येणे सोयीचे व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकात पूर्वेला व पश्चिमेला दोन्ही दिशेला रेल्वेच्या मध्यभागी असलेल्या पुलाला जोडून सरकते जिने बसविले. ठाणे स्थानकानंतर डोंबिवली रेल्वे स्थानकात हे जिने २०१३ मध्ये बसविण्यात आले. त्यानंतर कल्याण, बदलापूर या ठिकाणी सरकत्या जिन्यांची सुविधा रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना देऊ केली. मात्र हे जिने नक्की कुणासाठी बसविले, असा सवाल प्रवासी करीत आहेत. ऐन गर्दीच्या वेळेस हे जिने बंद असल्याने प्रवाशांना जिना चढतच जावे लागते. सकाळी ६ ते ११ या वेळेत हे सरकते जिने सुरू राहतील, असे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र सकाळी साडेआठ ते नऊदरम्यान हा सरकता जिना बंद असतो. त्यानंतर तो चालू होतो ते दुपारी एक-दोनपर्यंत सुरू असतो. त्यानंतर पुन्हा हा जिना बंद करण्यात येतो, ते सायंकाळी ५ च्या दरम्यान सुरू होतो. रात्री आठनंतर ही सुविधा बंद करण्यात येते. सकाळी ६ वाजल्यापासूनच डोंबिवली स्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू होते. ऐन गर्दीच्या वेळेस लोकांना धावतपळत लोकल पकडायची असल्याने त्या वेळी सरकत्या जिन्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र नेमक्या त्याच वेळी ही सोय उपलब्ध नसते. त्यामुळे प्रवासी नाराज आहेत.

‘येणारी जाणारी मुले किंवा काही तरुण सरकत्या जिन्याचे बटण वारंवार दाबत असल्याने तो नादुरुस्त होऊन बंद पडतो. त्यामुळे दुपारच्या वेळेत हा जिना बंद ठेवावा लागतो,’ अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. सरकत्या जिन्यांची देखभाल करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने खासगी संस्थांना दिली आहे. दुपारी फारसे प्रवासी नसताना ही सेवा बंद असणे योग्य आहे. मात्र सकाळी सहा वाजता जिना सुरू झाला पाहिजे, अशी प्रवाशांची मागणी आहे. खासगी कंपनीच्या ठेकेदाराने येथे एका कर्मचाऱ्याची कायमस्वरूपी नेमणूक करावी जेणेकरून प्रवासी आल्यास ते जिने सुरू करता येतील, असे प्रवासी ज्योती शिरसाठ यांनी सांगितले.