शाळकरी मुलांना नशेच्या विळख्यात ओढण्याचा डाव; ड्रग्जमाफिया शहरात सक्रिय

अमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या वसई-विरार शहरात आता शाळकरी मुलांना नशेच्या जाळय़ात ओढण्याचा डाव सुरू आहे. शहरातील काही शाळांमध्ये हेतुपुरस्सर अमली पदार्थ पुरविले जात असल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.

वसई, नालासोपारा शहरात मोठय़ा प्रमाणावर अमलीे पदार्थाचे छुपे व्यवहार चालत असतात. ड्रग्ज माफिया शहरात सक्रिय झाले असून त्यांनी तरुणांना आपले लक्ष्य बनवले आहे. पण आता या माफियांनी आपला मोर्चा महाविद्यालय आणि शाळांकडे वळवला आहे. वसईच्या नामांकित शाळेत अमलीे पदार्थ पुरवले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. चांगल्या घरातील मुले अमली पदार्थाच्या

आहारी जात असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी पालक त्यांना समुपदेशक आणि डॉक्टरांकडे घेऊन जात आहेत.

वसईतल्या एका नामांकित शाळेत आठवीचा मुलगा अमली पदार्थाच्या आहारी गेला आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या स्वच्छतागृहात अमली पदार्थ आणून ठेवले जात आहे. मुलाच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रारी केल्या, पण शाळेची बदनामी होईल म्हणून त्यांनी पोलिसांकडे जाण्यास नकार दिला. या मुलावर सध्या डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत.

एमडीचा वापर

एमडी हे स्वस्तात मिळणारा धोकादायक अमली पदार्थ आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुणांना ते पुरवले जात आहे. सुरुवातीला मजा म्हणून किंवा अभ्यासाचा ताण घालविण्यासाठी ते दिले जाते. हळहळू त्याचे व्यसन लागते. एमडीच्या अतिरिक्त सेवनाने मृत्यू ओढावण्याची शक्यता आहे.

‘पालकांनी पुढे यावे’

आमच्याकडे शाळेत अमली पदार्थ पुरवले जात असल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. त्या आल्यास आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करू, असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले. पालकांनी असे प्रकार होत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

नशेच्या आहारी मोठय़ा प्रमाणावर शाळकरी मुले जात आहेत. त्यांचे पालक माझ्याकडे मुलांना घेऊन येत आहेत. अमली पदार्थ न मिळाल्याने मुले हिंसक बनत असून प्रसंगी पालकांवर हात उगारालयाही ते मागे-पुढे पाहत नाहीत. शाळेमध्ये कोण अमली पदार्थ पुरवतो, शाळेच्या आसपास कुणाचा वावर असतो, तेथील दुकानांत काय मिळते याचाही शोध पोलिसांनी घेणे गरजेचेआहे.

डॉ. शशिकांत बामणे, संमोहनतज्ज्ञ