आमदाराच्या विनंतीवरून राज्य सरकारचा हस्तक्षेप
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील गुरुदेव अॅनेक्स या हॉटेलच्या परिसरातील निवाऱ्याचे बेकायदा बांधकाम तोडावयास गेलेल्या महापालिकेच्या पथकाला गुरुवारी याच भागातील भाजप समर्थक अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केला. कारवाई करण्यास अडथळा उभा करत असतानाच गायकवाड यांनी थेट राज्य सरकारकडे धाव घेतली आणि या कारवाईला स्थगिती मिळवली. यासंबंधीची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले असून त्यामुळे कारवाईसाठी मोठय़ा जोशात गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाला हात हलवत परतावे लागले.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी जाहीरपणे भाजपला पाठिंबा दिला आहे. ही राजकीय घडामोड ताजी असताना एका हॉटेलच्या बेकायदा निवारा शेडवरील कारवाई रोखावी यासाठी आग्रही असलेल्या गायकवाड यांची मागणी नगरविकास विभागाने लागलीच मान्य केल्याने येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुरुदेव अॅनेक्स हॉटेलच्या निवारा शेडचे बांधकाम बेकायदा असल्याचा अहवाल प्रभाग अधिकाऱ्यांनी देताच महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ते पाडण्याची पुरेपूर तयारी केली होती. त्यास गायकवाड यांचा विरोध होता.
या प्रकरणी महापालिका अधिकारी ऐकत नाहीत हे पाहून गायकवाड यांनी तात्काळ राज्य सरकारशी संपर्क साधला. राज्य सरकारने लगेच नगरविकास विभागाला ‘बांधकाम तोडण्याला तात्काळ स्थगिती आणि तात्काळ सुनावणी घेण्याचे’ आदेश दिले. नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी श्रीकांत जांभवडेकर यांनी तात्काळ कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना संदेश पाठवून गुरुदेव अॅनेक्सचे निवाऱ्याचे बांधकाम तोडण्याची कारवाई थांबविण्याचे आणि सुनावणी घेण्याचे आदेश दिले. नगरविकास विभागानेच कारवाई थांबविल्याने पालिका अधिकाऱ्यांचा नाइलाज झाला. कारवाई न करता हात हलवत अधिकारी परतले.
गुरुदेव अॅनेक्सभोवती बांधलेल्या अनधिकृत निवारा बांधकामाविषयी तक्रारी होत्या. या बांधकामाची परवानगी कागदपत्र हॉटेलमालक सादर करू शकला नाही. त्यामुळे पालिकेने निवारा शेडचे बांधकामे बेकायदा घोषित केले होते. हे बांधकाम तोडण्यासाठी ब प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार गुरुवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले. तेथे आमदार गणपत गायकवाड हजर झाले. त्यांनी कारवाईत हस्तक्षेप केल्याने अधिकारी हतबल झाले. दरम्यान, कल्याण पूर्व भागात पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बेकायदा बांधकामे सुरू आहेत.

आमदार गणपत गायकवाड यांच्या तक्रारीवरून कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून तपशील मागवण्यात आला आहे. पालिका आयुक्तांच्या अहवालाच्या आधारेच यासंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येईल. आयुक्तांना शुक्रवारी दुपापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले जाणार नाही.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
कारवाईला स्थगिती आहे..
हॉटेलमधील बांधकाम तोडण्यास मी विरोध केला नाही. फक्त, हे बांधकाम तोडण्यास स्थगिती आहे. एवढेच मी अधिकाऱ्यांना सांगितले. या बांधकामाबाबत पालिकेत सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर कारवाईबाबत निर्णय होईल. – गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व