मीरा-भाईंदरमधील पालकांना दिलासा

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : शुल्कवाढ तसेच वसुलीकरिता शाळांकडून तगादा लावला जात असल्याच्या पालकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची अखेर मीरा-भाईंदर महापालिकेने दखल घेतली आहे. चालू शैक्षणिक वर्षांत शाळा शुल्कात वाढ करू नये तथा काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही आणि त्याबाबतचा खर्च कमी झाल्यास त्यानुसार शाळा शुल्कात कपात करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना दिले आहेत. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

करोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. कित्येकांचे व्यवसाय ठप्प झाले असून  परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मोठा अवधी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांनी चालू शैक्षणिक वर्षांत (२०२०-२१) शाळेच्या कोणत्याही शुल्कात वाढ करू नये, असे स्पष्ट आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वीच दिले होते. असे असतानाही मीरा-भाईंदर परिसरातील अनेक शाळांनी पालकांकडे शाळा शुल्क भरण्यासाठी तगादा लावला आहे.

देय शुल्क एकाच वेळी भरण्याची सक्ती न करता मासिक, त्रमासिक अशा पद्धतीने भरण्याचा पर्याय पालकांना द्यावा, चालू शैक्षणिक वर्षांत कोणतेही शुल्कवाढ करू नये तसेच काही शिक्षण सुविधांचा वापर करावा लागला नाही आणि त्याबाबतचा खर्च होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करून त्याप्रमाणे योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे, टाळेबंदीच्या कालावधीत पालकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करावा, शाळा विद्यार्थ्यांकडून जे काही शुल्क घेते त्याची रीतसर पावती प्रत्येकाला देण्यात यावी, असे आदेश शिक्षणाधिकारी ऊर्मिला पारथे यांनी जारी केले आहेत.

आदेशातील बाबींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. हा आदेश सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या व पूर्वप्राथमिक ते इयत्ता १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे.

पालक तसेच लोकप्रतिनिधींकडूनही शाळा शुल्कवाढीशी संबंधित वारंवार तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार सर्व शाळांना शुल्कवाढ न करण्याबाबत कळविले आहे. टाळेबंदी संपल्यानंतर शुल्क जमा करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

– ऊर्मिला पारथे, शिक्षणाधिकारी, मीरा-भाईंदर महापालिका

करोनामुळे कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्याचा विचार करून शाळा व्यवस्थापनाने थोडा संयम पाळावा. पालकांना मानसिक त्रास होईल, अशा पद्धतीने शुल्क वसुलीचा तगादा लावू नये.

– राजेश गवस, त्रस्त पालक