26 January 2021

News Flash

भिवंडी मेट्रोला राजकीय ग्रहण

मूळ आराखडय़ाप्रमाणे मेट्रो उभारण्याची भाजपची मागणी

मार्गबदलासाठी फेरसर्वेक्षणाचे नगरविकासमंत्र्यांचे आदेश; मूळ आराखडय़ाप्रमाणे मेट्रो उभारण्याची भाजपची मागणी

ठाणे : ठाणे, भिवंडी आणि कल्याण या मेट्रो मार्गाचे आरेखन नागरिकांच्या तक्रारीनंतर बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दोन महिन्यांपूर्वी दिले असतानाच, त्याला भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी विरोध केला आहे. मूळ आराखडय़ाप्रमाणेच भिवंडी मेट्रो मार्ग करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे मेट्रो मार्गावरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून या वादात मेट्रो प्रकल्पाचे काम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही शहरांना जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीत बांधकामांचा अडसर ठरत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. या प्रकल्पासाठी भिवंडी शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा धामणकर नाका उड्डाणपूल पाडावा लागणार असल्याचा निष्कर्ष प्राधिकरणाने काढला आहे. या परिसरात सरकारी रुग्णालय, भिवंडी न्यायालय, भिवंडी महापालिका, एसटी बस थांबा यासह अनेक महत्त्वाची खासगी कार्यालये आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या अनेकांचे हाल होणार असून येथील वाहतूक कोंडीचा भार मुंबई-नाशिक महामार्गावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात बांधकामे बाधित होणार असून या नागरिकांकडून मेट्रो मार्गाचे आरेखन बदलण्याची मागणी होत होती. त्याचप्रमाणे कल्याणमधून जाणारा मेट्रो मार्गही दुर्गाडीहून थेट एपीएमसीला नेण्याऐवजी बिर्ला कॉलेजमार्गे नेण्याची मागणी  होत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने या मार्गाचे आरेखन बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र या सर्वेक्षणास भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी विरोध केला आहे.

एमएमआरडीएने कापूरबावडी, बाळकूम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकर नाका, गोपाळनगर, टेमघर, रांजणोली, गोवेगाव एमआयडीसी, कोन गावमार्गे कल्याण एपीएमसी असा मार्ग मूळ आराखडय़ानुसार निश्चित केला होता. मात्र भिवंडीतील वंजारपट्टी नाका, गायत्रीनगरमार्गे मेट्रो मार्ग वळविण्याची मागणी करण्यात येत आहे. ती अव्यवहार्य असून, मूळ मार्गाप्रमाणेच मेट्रोचे काम सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार पाटील यांनी म्हटले आहे. तसेच भिवंडीतील नागरिकांनी मूळ आराखडय़ाप्रमाणे मेट्रोच्या मागणीसाठी सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले. या मार्गातील बदल व्यवहार्य नसून, तो बदलण्याचे राजकारण करणे चुकीचे आहे. तसेच नगरविकासमंत्री शिंदे यांनी मूळ आराखडय़ाप्रमाणेच मेट्रोचे काम वेगाने सुरू करण्याचे आदेश एमएमआरडीएला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला..

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यांचे आभार मानायला पाहिजेत. त्यांनी मेट्रोला मंजुरी देऊन आपल्या कारकीर्दीतच निविदाही काढली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. मात्र आता मेट्रोचे श्रेय घेण्याचे राजकारण सुरू असून काही लोकांनी पोस्टरबाजी, बॅनरबाजी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार येण्याआधीच तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारने मेट्रोचे काम सुरू केले होते, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 4:34 am

Web Title: eknath shinde order to changing route of metro 5 zws 70
Next Stories
1 अंबरनाथमध्ये महाविकास आघाडी?
2 ठाणे स्थानक परिसरात विस्तीर्ण पदपथ
3 कलाविष्काराने अंबरनाथकर रसिक मंत्रमुग्ध
Just Now!
X