tvlog01उन्हाळी सुट्टीमध्ये ट्रेकिंग, सहली, खेळ, मौजमजा करण्यासाठीचे नियोजन महाविद्यालयीन तरुणाई करू लागली असतानाच काही विद्यार्थी मात्र सामाजिक कार्यामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. कल्याणच्या अगरवाल महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने पिंपळास गावामध्ये सुरू झालेल्या सुट्टीच्या काळातील सामाजिक उपक्रमाने दोन वर्षांमध्ये मोठी मजल मारली असून विद्यार्थी, महिला आणि गावक ऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम होण्याचा मान या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाने मिळवला आहे.
कल्याणपासून पाच ते सात किलोमीटरवर कोण गावाजवळ पिंपळास हे पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावातील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिकून पुढे महाविद्यालयातील शिक्षणासाठी कल्याण गाठतात. अभ्यासासाठी मर्यादित वातावरण आणि पुस्तकांचा तुटवडा या भागातील विद्यार्थ्यांना नेहमीच जाणवत होता. या गावातून अगरवाल महाविद्यालयात शिकत असलेल्या महेंद्र पाताळे आणि त्यांच्या मित्र मंडळींनी या परिस्थितीची जाणीव विद्यालयातील शिक्षकांच्या कानावर घातल्यानंतर या भागात ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. २०१३मध्ये महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने या ग्रंथालयास मदत देण्याचे निश्चित झाले. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मीनल सोहनी यांच्यासह महेंद्र भिवंडीकर, सुजाता दिवाळे, अर्पिता कुलकर्णी, अनघा राणे या प्राध्यापक वर्गाने महाविद्यालयाच्या वतीने पुस्तकांची मदत केली. सुमारे ५०० हून अधिक पुस्तके पिंपळास गाव येथे पोहोचवण्यात आली. ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये ग्रंथालयास सुरुवात करण्यात आली.
ग्रंथालयात येणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने या भागात अभ्यासिकेची गरज भासू लागली. स्थानिक माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्येच अभ्यासिकेस सुरुवात करण्यात आली. या वेळी या तरुणांनी एकत्र येऊन ‘युवा संघर्ष सामाजिक संस्था’ या संस्थेची सुरुवात केली. यामध्ये अगरवाल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेंद्र पाताळे, अभय जाधव, विकास कोळी, विजय पाटील, योगेश पाटील, अतिश नागावकर, राजेंद्र नागावकर, किरण भोईर, राहुल म्हात्रे, देवेंद्र मढवी, इंद्रमल भोईर, शिरीश पाटील या तरुणांचा समावेश होता. या तरुणांबरोबरीने गावातील ‘ग्रामविकास युवा प्रतिष्ठान’ या संस्थेनेही मदत केली.
सध्या या दोन्ही उपक्रमांतर्गत ग्रंथालय, अभ्यासिका या बरोबरीनेच आरोग्य शिबीर, मार्गदर्शन शिबीर, क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना कॅरम, बुद्धिबळ आणि मैदानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. महिलांसाठी आरोग्य शिबिराबरोबर ‘कन्या वाचवा’ यांसारखे जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याशिवाय ‘किल्ले वाचवा’ मोहिमेमध्येही येथील तरुण सहभागी आहेत. अगरवाल महाविद्यालयातून आवश्यकतेनुसार मार्गदर्शन देण्यासाठी प्राध्यापक मंडळी जात असतात. दोन वर्षे पूर्ण झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून गावातील एक चांगला उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे, अशी माहिती महेंद्र पाताळे यांनी दिली.

रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प
‘पाणी’ ही मानवाच्या अत्यावश्यक गरजांपैकी एक महत्त्वाची गोष्ट. पण पृथ्वीतलावर असलेल्या पिण्याच्या पाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी बचतीच्या कितीही योजना राबवल्या तरी त्या फोल ठरत आहेत. त्यामुळे पाण्याचा काळजीपूर्वक वापर आणि संर्वधन ही काळाची गरज आहे. नेमकी ही गरज ओळखून मुलुंड येथील सौ. कमलाबाई इंग्रजी माध्यमाची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयाच्या आवारात प्रजन्य जलसंधारण योजना (रेन वॉटर हॉर्वेस्टिंग) राबविण्यात आली. या प्रकल्पाचा शुभारंभ संस्थेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती प्रसाद कुलकर्णी यांनी दिली. शाळेच्या छतावर पडणारे पाणी एका छोटय़ा टाकीत जमा करून नंतर ते खाली असलेल्या मोठय़ा टाकीत साठवले जाणार आहे. या बचत केलेल्या पाण्याचा वापर दुय्यम कामांसाठी म्हणजेच बागकाम, साफसफाई, स्वच्छतागृहे यांसाठी करता येईल. या प्रकल्पामुळे शाळेतील विद्यार्थ्यांवर पाणीबचतीचा संस्कार करता येईल. पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी मदत होईल, असेही कुलकर्णी यांनी
सांगितले.

चांदीबाई महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव
‘‘विद्यार्थ्यांचा देशकार्यात मोलाचा वाटा असावा आणि भविष्यातील युवा पिढीने देशाचे नाव जगात मोठे करावे, तसेच भारताच्या ६८ वर्षांच्या स्वातंत्र्याला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य पार पाडावे व राष्ट्रबांधणीच्या कार्यात झोकून द्यावे,’’ असा संदेश जे. पी. वासवानी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळ्यानिमित्त बोलते होते. ‘चांदी दौड’ या स्पर्धेने सोहळ्याची सुरुवात झाली. या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी कला, साहित्य, चर्चासत्र, नृत्य संगीत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ९६ वर्षांच्या दादाजी यांनी त्यांच्या प्रखर वाणीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान, शिक्षण, कला, संस्कृती आणि नीतीचे बोध देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ.पद्म देशमुख यांनी स्वागत केले. के. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजू निचानी यांनी साधू वासवानी मिशनचे कार्य विशद केले. हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्डचे विश्वस्त श्री किशू मनसुखानी यांनी दादाजींचा सन्मान केला. या कार्यक्रमास महेश गुरदासानी, रितिका सचदेव, उपप्राचार्य डॉ. शीला अहुजा आदी मान्यवर उपस्थित होते. उपप्राचार्य सतराम विऱ्हानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  नितीन आरेकर, सुभाष आठवले, डॉ. किशोर पेशोरी, आणि रेणू सचदेव यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला.

पेंढरकर महाविद्यालयात नेमबाजी प्रशिक्षण
प्रतिनिधी, डोंबिवली
डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईनंतर उपनगरात प्रथमच हे केंद्र उभे राहिल्याने नेमबाजीची आवड असणारे खेळाडू या केंद्रास चांगला प्रतिसाद देऊ लागले आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी नेमबाजी प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असल्याने या केंद्राची उभारणी करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका डॉ. अनुराधा रानडे यांनी स्पष्ट केले. १ मेपासून येथे गन फॉर ग्लोरी अ‍ॅकॅडमीच्या वतीने लेव्हल १ व २ चे वर्ग सुरू होणार आहेत. गगन नारंग स्पोर्ट्स फाऊंडेशनचे गगन नारंग हे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते नेमबाज असून ते आता येथील मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. गगन नारंग व पवन सिंग हे या अ‍ॅकॅडमीचे संचालक असून त्यांच्या वतीने एअर रायफल शूटिंगचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. १० वर्षांवरील कोणीही यात सहभागी होऊ शकतात. लेव्हल वनच्या बॅचेस सकाळी ९ ते ११ व दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत भरणार आहेत.   जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा, असे प्रशिक्षक संयुक्ता हसमनीस-गुप्ते यांनी सांगितले. संपर्क : ०२५१-३२४४५५५, ९३२२२३३५५५.

‘सरकारी धोरणांचा परिणाम काही काळानंतर’
नवीन धोरणांसाठी सरकारला हा काळ चांगला आहे. परंतु अजून काही काळाने प्रत्यक्षात नवीन धोरणांचा परिणाम झालेला दिसेल, असे मत मुथ्थुट समूहाचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अलेक्झांडर यांनी व्यक्त केले. नवी मुंबईतील सानपाडा येथील ‘इंदिरा इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’तर्फे व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कॉपरेरेट जगताची ओळख व्हावी या उद्देशाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नोकरीच्या संधी निर्माण होण्याबरोबरच व्यावसायिकांसाठीही हा सुवर्णकाळ आहे, असे मत अलेक्झांडर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.