दोघा कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला; विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे दुर्घटना

ठाणे येथील पाचपाखाडी भागातील महापालिका मुख्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागून सर्वत्र धूर पसरल्याने गुरुवारी दुपारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पळापळ झाल्याचे चित्र दिसले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभागातील दोघा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूला विद्युत यंत्रणा बसविण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी या यंत्रणेत बिघाड झाल्याने आग लागून धूर येत होता. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर सर्वत्र धूर पसरला होता. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून सुरक्षारक्षकांनी आगीची वर्दी देण्यास सुरुवात केली, तसेच सर्वाना इमारतीबाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह नागरिकांची पळापळ सुरू झाली. मुख्यालय इमारतीबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच जवाहरबाग अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र त्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी पोहोचले. मुख्यालय इमारतीजवळच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कार्यालय असून त्या विभागातील प्रशांत भोईर आणि रामचंद्र मुकादम हे दोघे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे लागलेल्या आगीने भीषण रूप धारण करण्याआधीच दोघांनी प्रसंगावधान दाखवत अग्निशमन उपकरणाने ही आग विझविली. त्यामुळे इमारतीतील मालमत्तेचे नुकसान तसेच जीवितहानी टळली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सर्वत्र पाहणी केली आणि आग विझल्याची खात्री केली.