मुंबई-ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीत दिवसेंदिवस नवनव्या पदार्थाची भर पडत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील पदार्थाबरोबरच काही परदेशी पदार्थही खवैयांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातला कुठेही आणि कधीही मिळणारा आणि खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे सँडविच. त्याचबरोबर पास्ता, बर्गर हे इतर परदेशी पदार्थही दिसू लागले आहेत. ठाण्यातील ‘फ्लेवर्स ऑफ स्पाइस’ म्हणजे खाद्यरसिकांसाठी फास्ट फूड मेजवानीच.
१८ व्या शतकात युरोपमध्ये सँडविच या पदार्थाचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात २ ब्रेडमध्ये प्राण्यांचे मांस असे सँडविचचे स्वरूप होते. त्यानंतर काळानुरूप सँडविचचे अवतार बदलत गेले. त्यात सलाड, विविध भाज्या, चीज, जॅम अशा विविध पदार्थाचा वापर केला गेला. ‘फ्लेवर्स ऑफ स्पाइस’चे वैशिष्टय़ म्हणजे या दुकानात दरमहिन्याला एक नवीन प्रकारचा फ्युजन सँचविच खाद्य रसिकांच्या भेटीला आणला जातो. ‘फ्लेवर्स ऑफ स्पाइस’मध्ये आपल्याला विविध एकूण ३३ प्रकारचे सँडविच चाखायला मिळतात. व्हेज टोस्ट, चेज चीज टोस्ट, शेजवान चीज टोस्ट अशा सर्वपरिचित सँडविचबरोबरच तोंडात टाकल्यावर पटकन विरघळणारा चीज असलेला मेल्टिंग ग्रिल सँडविच, काळीमिरी टाकून तयार केलेला पेपाराझी सँडविच, शेव पुरी सँडविच, कॉर्न पनीर सँडविच, भाज्या व तिखट चव असलेले चीलमिल चीज टोस्ट सँडविच, गोड चव आवडणाऱ्यांसाठी चॉकलेट व्हॅनिला सँडविच येथे मिळतो. त्याचबरोबर विविध भाज्या, चीज, ३ प्रकारचे सॉस व २ चटण्यांचा मिळून तयार केलेले ग्रिल सँडविच, इंडिअन टेस्ट असलेले ‘मुंबई ग्रिल सँडविच व व्हेज मायो सँडविच, क्लब सँडविच अशा विविध प्रकारचे सँडविच येथे मिळतात.
सँडविचबरोबरच पिझ्झा, रोल्स, ओपन ब्रेड सँडविच, गार्लिक ब्रेड, मसाला पाव, पावभाजी, पास्ता अशा विविध प्रकारच्या पदार्थाचीही चव येथे चाखायला मिळते. नाचोस, पोटॅटो नगेटस्, व्हेजी नगेट्स असे विविध प्रकारच्या हलक्या फुलक्यास्टार्टरबरोबरच पिझ्झामध्ये रोस्टेड पनीर व तिखट-गोड बेस असलेला प्यापी पनीर पिझ्झा, चम्पियन पिझ्झा, मुंबई मसाला पिझ्झा, तंदुरी पिझ्झा, गार्लिक कॉर्न पिझ्झा, इंडिअन स्मोक असे वेगळ्या प्रकारचे पिझ्झासुद्धा येथे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बर्गर व रोल्समध्ये आलू टिक्की व्हेज बर्गर किंग बर्गर व रोल्समध्ये व्हेजरोल पनीर, शेजवान रोल अशा सर्वपरिचित रोल्सबरोबरच व्हेज कबाब रोल, पनीर बेबी कॉर्नरोल, मश्रूम टिक्का रोल, मिक्स रोल अशा विविध भाज्यांचे मिश्रण असलेले रोल्ससुद्धा येथे आपल्याला चाखायला मिळतात. तसेच पास्तामध्ये टॉमॅटोचे सार व बटरमध्ये तयार केलेला एरेबिटा पास्ता, चीज आणि यल्लो पास्ताचा मिश्रण असलेला नेपोलिअन पास्ता, चीज सॉस पास्ता, पास्ता एन पास्ता असे पास्त्याचे विविध प्रकार म्हणजे पास्ताप्रेमींसाठी मेजवानीच. लाल मसाल्याऐवजी हिरव्या भाज्या वापरून तयार केलेली व त्यामुळे हिरवा रंग प्राप्त झालेली ग्रीन पावभाजी, काळीमिरी वापरून तयार केलेली पेपरपाव भाजी अशा नाविन्यपूर्ण पावभाजींच्या प्रकारांबरोबरच जैन पावभाजी, पनीर पावभाजी, कोल्हापुरी पावभाजी अशा घरगुती पावभाज्यांचीसुद्धा चव चाखायला मिळते. गार्लिक ब्रेडमध्ये चिली चीज गार्लिक ब्रेड, मस्का गार्लिक, पनीर चीज गार्लिक व सगळ्या प्रकारचे मिश्रण असलेला असोर्टेड गार्लिक ब्रेड म्हणजे खवैयांसाठी खाद्य खजिनाच.
या सगळ्या फास्ट फूडबरोबरच बटर तवा पुलाव, पनीर चीज तव पुलाव, जिरा राइस, स्टीम राइस असे विविध प्रकारचे राइस म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारचे परिपूर्ण जेवणच. अशा सर्व फास्ट फूड व राइसच्या मेजवानीनंतर मोसंबी ज्यूस, कलिंगड ज्यूस, सफरचंद ज्यूस अशा परिचित असलेल्या फळांच्या रसाबरोबरच ताडगोळ्याचा रस म्हणजेच समर क्विनजूस, पीना कोलाडा, झेब्रा असे वेगळ्या प्रकारचे ज्यूस व त्याचबरोबर चॉकलेट मिल्कशेक, बटर स्कॉच मिल्कशेक, किवी, लिची व सफरचंद यांचा मिश्रण करून बनवलेला सिंड्रेला मिल्कशेक, सीताफळ, नारळ, लिची अशा पांढरा गर असणाऱ्या फळांपासून बनवलेला गोरा-गोरी मिल्कशेक म्हणजे खाद्य रसिकांसाठी फास्ट फूड मेजवानीच. त्याचबरोबर रॉयल फालुदा, ब्लॅकफॉरेस्ट फालुदा, ड्राय फ्रुट फालुदा अशा विविध प्रकारच्या फालुद्यांबरोबर सीताफळ राजा, चोको मोचो, मिक्स फ्रूट क्रीम असे डेझर्ट विथ क्रीम असे गोडीचे पदार्थही येथे मिळतात.
‘फ्लेवर्स ऑफ स्पाइस’चे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारे मेल्टिंग ग्रिल सँचविच. पनीर लसुनी नावाचा ओपन सँडविच. मेल्टिंग ग्रिल सँडविच हे तीन ब्रेडच्या थरांनी बनविले जातात. पहिल्या थरात मेक्सिकन सॉस, पनीर, विविध भाज्या, चीज यांचे मिश्रण असते. दुसऱ्या थरात सॅलेड म्हणजेच काकडी, टॉमॅटो बीट, कोबी असतात. तिसऱ्या थरामध्ये चीज व मायोनीज असते. यामध्ये असलेल्या मेल्टिंग चीजमुळे हे सँडविच तोंडात टाकल्यावर पटकन विरघळून जाते. ‘फ्लेवर्स ऑफ स्पाइस’चे आणखी एक वेगळेपण म्हणजे येथे मिळणारा पिंक टान्गो पास्ता. हा पास्ता व्हाइट सॉस, रेड पास्ता सॉस, ब्रोकोली,मका, कांदा, मश्रुम, हिरवी, लाल व पिवळी शिमला मिरची (बेल पेपर्स) या सगळ्याला बटर व चीजमध्ये भाजतात.