राज्य उत्पादन शुल्क विभागची विशेष मोहीम; महामार्गावर तपासणी नाके; जागोजागी छापासत्रे

वसई : नाताळ आणि नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर परराज्यातून मोठय़ा प्रमाणावर बेकायदा मद्य शहरात आणले जात आहे. या महिन्यात शहरात अनेक ठिकाणी छुप्या मद्यपाटर्य़ा होणार असून कारवाई टाळण्यासाठी त्यांच्या जाहिराती ऑनलाइन दिल्या जात आहेत. हा चोरटा मद्यसाठा आणि बेकायदा पार्टी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून विविध ठिकाणी छापासत्रे सुरू केली आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विविध ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत.

डिसेंबर महिन्यात नाताळचा सण आणि नववर्षांचे स्वागत केले जाते. त्यासाठी परराज्यातून मोठय़ा प्रमाणावर बेकायदा मद्य शहरात आणले जात असते. त्यावर राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते. त्यामुळे आता ही कारवाई टाळण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासूनच हा साठा चोरटी वाहतूक करून आणला जात आहे. तो रोखण्यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाने मोहीम उघडली आहे. त्यासाठी सर्व महामार्गाच्या नाक्यांवर तपासणी नाके उघडण्यात आले आहेत, तसेच जागोजागी छापासत्र सुरू करण्यात आले आहे. १ डिसेंबरपासून केलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापा टाकून तब्बल ५२ लाखांचे मद्य जप्त केले आहे तर १३ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्ह्याचे अधीक्षक डॉ विजय भुकन यांनी दिली. मद्यविक्रीवर शासनाकडून उत्पादन शुल्क आकारले जाते. राज्यात मद्यवरील उत्पादन शुल्क ५० टक्के असून ते इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. दीव-दमण, दादरा नगरहवेली आदी केंद्रशासित प्रदेशात मद्यावरील उत्पादन शुल्क अत्यंत कमी म्हणजे १२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तिथे मद्य स्वस्त दरात मिळते. याचा फायदा घेत या प्रदेशातून चोरटय़ा मार्गाने मद्य पालघर जिल्ह्यात आणि तेथून पुढे मुंबईत नेले जाते. यामुळे राज्य शासनाचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडत असतो.

मोहीम काय?

* उत्पादन शुल्क चुकवून येणारा मद्यसाठा रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

*  झाई, मालतलासरी, चारोटी येथे तीन भरारी पथके तैनात ठेवली आहेत.

*  खानिवडे टोल नाक्यावर आमची नियमित तपासणी सुरू असते. इतर राज्यातून येणारा मद्यसाठा या मार्गाने मुंबई, ठाणे, नाशिक आणि वसई-विरारमध्ये आणला जातो. त्यामुळे या महत्त्वाच्या नाक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

*  पहिल्या दहा दिवसांतच ५० लाखांहून अधिक रकमेचा मद्यसाठा जप्त केला आहे.

ऑनलाइन पार्टीवर नजर

डिसेंबर महिन्यात मोठय़ा प्रमाणावर पाटर्य़ाचे आयोजन होत असते. त्यात चोरटे मद्य तसेच अमली पदार्थाचा वापर केला जातो. या छुप्या पाटर्य़ा शोधून त्यावर कारवाई करणे मोठे आव्हान असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा पाटर्य़ाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या पाटर्य़ाच्या जाहिराती ऑनलाइन संकेतस्थळावर असतात. त्या शोधण्यास सुरुवात केल्याची माहिती अधीक्षक भुकन यांनी दिली. शनिवारी आणि रविवारी मोठय़ा प्रमाणावर अशा पाटर्य़ा होत असतात. त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसई-विरारमध्ये अनेक रिसॉर्ट असून खासगी पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. त्यांना परवाने बंधनकारक आहेत. मात्र त्या ठिकाणी बेकायदा मद्यविक्री होते. अशा ठिकाणी कारवाई करण्याची खास योजना तयार केल्याची माहिती भुकन यांनी दिली.