ठाणे, कल्याणात सार्वजनिक मंडळे दोन हजार, जोडण्या मात्र  ७००
गणेशोत्सवाच्या काळात होणारी वीजचोरी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अत्यल्प दरात वीजजोडणी पुरवण्याची योजना सुरू करूनदेखील बेकायदा वीजजोडणी करून गणेश मंडप प्रकाशमान करण्यातच मंडळांनी धन्यता मानली आहे. ठाणे आणि कल्याण शहरांत तब्बल दोन हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असताना ठाण्यातून जेमतेम ३५० व कल्याणमधून ४०० मंडळांनीच अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. अन्य मंडळांनी सालाबादप्रमाणे चोरीच्या मार्गाने वीजजोडण्या घेऊन आपला कार्यभाग साधल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहरात अधिकृत वीजजोडणी घेणाऱ्या मंडळांची संख्या जवळपास सव्वाशेने कमी झाली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावरील पथदिवे, मीटर यांच्या माध्यमातून चुकीच्या मार्गाने जोडणी घेण्याचे प्रकार मंडळांकडून घडतात. त्यामुळे वीज मंडळाचे उत्पन्न बुडतेच; शिवाय अशा ठिकाणी अपघाताचीही शक्यता असते. हे लक्षात घेऊन महावितरणने गणेशोत्सव मंडळांना वाणिज्य आणि घरगुती ग्राहकांपेक्षा कमी दराने वीजपुरवठा करण्याची योजना आखली होती. परंतु त्याला मंडळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे यंदा १ हजार ५३ गणेशोत्सवांची स्थापना झाली असली तरी त्यापैकी सरासरी ७५० मंडळांनी वीजपुरवठा घेतला आहे. त्यामुळे सुमारे ३००हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी वेगवेगळ्या मार्गाने वीज जोडणी घेतली आहे. चोरटय़ा पद्धतीने वीज जोडणी घेणाऱ्यांची संख्या कमी होत असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वीज जोडणी कमी झाली असल्याचे महावितरणच्या भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी स्पष्ट केले. कल्याण विभागातील सुमारे एक हजार मंडळांपैकी ४०० मंडळांनी स्वतंत्र वीज जोडणी घेतली आहे.
अनधिकृत वीजपुरवठा घेणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यासाठी भांडुप परिमंडळातील वाशी आणि ठाणे क्षेत्रांत दोन दामिनी पथकांची स्थापना करण्यात आली असून अनधिकृत वीजजोडणी करणाऱ्यांना दंड आकारण्यासोबतच तात्काळ वीज मीटर दिले जात असल्याची माहिती करपे यांनी दिली.
‘महावितरणकडून सहकार्य नाही’
उत्सवांकरिता महावितरणकडून मंडळांना स्वतंत्र वीज जोडण्या देण्यात येतात. त्यासाठी महावितरण सुमारे पाच हजार रुपये अनामत रक्कम घेते. मात्र ही रक्कम परत मिळत नसल्याचा आरोप अनेक मंडळांनी ठाणे पोलिसांच्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही अनामत रक्कम परत देण्यात आल्याचा दावा केला. मागील वर्षीच्या या अनुभवामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची महावितरणकडील स्वतंत्र जोडणीची संख्या घटल्याचे मंडळांकडून म्हटले जात आहे.