रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कल्याण-डोंबिवलीच्या पाचवीला पुजलेली आहेच, त्यात आता वाहन दुरुस्ती करणाऱ्या दुकानांची भर पडली आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि नियोजनाचा अभाव यामुळे शहरात ठिकठिकाणी बेकायदा वाहन दुरुस्ती करणारी दुकाने सुरू झाली आहेत. दुकानांनी वाहतुकीच्या अडथळ्यात मोठी भर घातली आहे. या दुरुस्तीच्या दुकानांतून रस्त्यावर सांडलेल्या वंगणामुळे अपघातांची शक्यताही निर्माण झाली आहे..

कल्याण-डोंबिवली शहर परिसरात तीन ते साडे तीन लाख दुचाकी, चारचाकी, रिक्षा, अवजड, केडीएमटी, खासगी बस अशी १० ते १२ प्रकारची वाहने आहेत. वाहनांची संख्या ज्या प्रमाणात वाढतेय, त्या प्रमाणात ती वाहने दुरुस्त करण्याची दुकानेही (गॅरेज)  तेवढय़ाच जोमाने शहरात वाढत आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांचे गेल्या पंचवीस वर्षांत विकासाच्या बाबतीत कोणतेही आखीव रेखीव नियोजन झालेले नाही. अतिशय अनिर्बंधपणे दोन्ही शहरांचे नागरीकरण होत आहे. मात्र त्याप्रमाणात पायाभूत सुविधा मात्र उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.  शहर विकासात मोलाची भर घालणारी पालिकेची १२१२ आरक्षणे होती. या आरक्षणांवर उद्याने, बगीचे, शाळा, वाहनतळ, रुग्णालय अशा सार्वजनिक सुविधा देण्यात येणार होत्या. या आरक्षणांमधील ६०० आरक्षणे बेकायदा बांधकामांनी पूर्णत: बाधित झाली आहेत. ४०० आरक्षणे अंशत: बाधित झाली आहेत. (म्हणजे तीही माफियांनी गिळंकृत केली आहेत) उर्वरित फक्त १०० आरक्षणे पालिकेच्या ताब्यात आहेत. आरक्षित भूखंडांना पालिकेकडून कोणतेही कुंपण घालण्यात आले नसल्याने ही आरक्षणेही येणाऱ्या काळात भूमाफियांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. २७ गावांमध्ये सुमारे ७१० एकर मोकळी जमीन आहे. पालिकेची अनेक आरक्षणे या भागात आहेत.

संबंधित भूखंडांचा त्या त्या कामासाठी उपयोग केला तर शहरात आखीव रेखीव कामे उभी राहू शकतात. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने नियोजनाचा पूर्ण गोंधळ उडाला आहे. आजघडीला कल्याण डोंबिवली शहरांची लोकसंख्या १५ लाख १८ हजार आहे. सुमारे आठ ते नऊ लाख रहिवासी दररोज नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. हा सगळा प्रवासी वर्ग रिक्षा, बस, खासगी वाहनाने प्रवास करीत असतो. सुमारे दोन लाख प्रवासी रिक्षा, बस अशा वाहतूक साधनांनी प्रवास करतात. उर्वरित प्रवासी आपल्या खासगी दुचाकी, चारचाकी वाहनांनी प्रवास करतात. अशा प्रवाशांची दररोजची संख्या सुमारे ७ ते ८ लाख आहे. म्हणजे शहरातील लोकवस्ती ज्या प्रमाणात वाढत आहे, त्या प्रमाणात शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे.

वाहन दुरुस्ती दुकानांची डोकेदुखी

वाहने वाढली म्हणजे ती ठेवण्यासाठी इमारतीच्या तळ मजल्याला वाहनतळ नसल्याने ती रस्त्यावर उभी करून ठेवली जातात. रेल्वे स्थानक परिसरात पालिकेकडून वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे बहुतेक वाहने वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या रस्ते, गल्ली-बोळात उभी केली जातात. या समस्येमुळे शहरातील वाहतूक कोंडी वाढतच आहे. त्यात आता वाढत्या वाहन संख्येमुळे नवीन दुखणे शहरात वाढत आहे. ते म्हणजे शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळात वाहन दुरुस्तीची दुकाने मोठय़ा संख्येने सुरू होत आहेत. पालिका, पोलीस, वाहतूक विभाग, दुकाने व परवाना विभाग यांच्या कोणत्याही परवानग्या न घेता हे उद्योग सुरू आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यावरील एखादा गाळा भाडय़ाने घेऊन तिथे रिक्षा दुरुस्ती, दुचाकी, चारचाकी वाहने दुरुस्तीची कामे सुरू करतात. या दोन्ही शहरांमध्ये अशाप्रकारची सुमारे शंभरहून अधिक वाहन दुरुस्तीची दुकाने भर रस्त्यात सुरू आहेत. वाहन दुरुस्तीवर गाळ्याचे भाडे, कामगार यांचा खर्च भागविणे शक्य नसल्याने ही मंडळी जोडधंदा म्हणून वाहन उपयोगी सामान ठेवणे. टायरमध्ये हवा भरण्याचे यंत्र आणून ठेवणे असे उद्योग करतात. आता तर अशा दुरुस्ती दुकानांनी आपला पसारा भर रस्त्यात मांडायला सुरुवात केली आहे.

वाहन दुरुस्त करताना वंगण रस्त्यावर पडते. रस्ते खराब होतात. निवासी वस्तीच्या तळ मजल्यावर असणाऱ्या गाळ्यात अशी दुकाने असतात. त्यामुळे सततच्या वाहनांच्या आवाजामुळे, दुरुस्तीच्या ठकठकीमुळे रहिवासी हैराण होतात. पुन्हा मालकाला याबाबत जाब विचारण्याची मुभा रहिवाशांना नसते. कारण इमारतीचा मालक भूमिपुत्र असतो. त्यामुळे निमूटपणे हा अन्याय रहिवाशांना सहन करावा लागतो.

रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या वाहनांनाही दुरुस्तीच्या या दुकानांचा अडथळा होतो. कारण रस्त्याची एक बाजू पूर्णपणे ‘दुरुस्ती’वाल्यांनी व्यापलेली असते. विशेष म्हणजे पोलीस, वाहतूक पोलिसांची वाहने या दुकानांसमोरून जातात. मात्र त्यांना त्यात काहीही वावगे वाटत नाही. रस्त्यावरील या अतिक्रमणाकडे ते कानाडोळा करतात.

कटकट बंद करा

कल्याणमधील मुरबाड रस्ता, संतोषी माता रस्ता, तिसगाव, कोळसेवाडी, काटे मानिवली, लालचौकी, डोंबिवलीत कोपर उड्डाणपुलाजवळ, मानपाडा रस्ता, टाटा लाईनखाली कस्तुरी प्लाझाजवळ, महात्मा फुले रस्ता दत्त मंदिरासमोर, सम्राट हॉटेल चौकाजवळ, टिळक रस्ता अशा अनेक ठिकाणी दुरुस्तीच्या दुकानांचा सुळसुळाट आहे. आपल्यामुळे कुणाला त्रास होतोय याचेही त्यांना भान नसते. शिळफाटा रस्त्याचा मानपाडा पोलीस ठाणे ते डोंबिवली नागरी सहकारी बँकेदरम्यान जो सेवा रस्ता (सव्‍‌र्हिस रोड) आहे, तो रस्ता अशाच दुकानांनी गजबजून गेलेला आहे. शिळफाटा रस्त्यालगतची सगळीच वाहन दुरुस्ती दुकाने बेकायदा असल्याने पालिकेने ती सहा महिन्यापूर्वी जमीनदोस्त केली. या दुकानांमधील बेरोजगार झालेले तंत्रज्ञ आता शहरातील गाळे भाडय़ाने घेऊन नव्याने वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीला जशी वाढती वाहने जबाबदार आहेत, त्याचप्रमाणे रस्ते, गल्लीबोळात सुरू झालेली ही नियमबाह्य दुरुस्ती दुकानेही तितकीच जबाबदार आहेत. येत्या दहा ते पंधरा वर्षांत कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या २० ते २५ लाख असेल. त्या प्रमाणात वाहन संख्याही वाढणार आहे. त्या तुलनेत दुरुस्तीची दुकाने वाढणार आहेत. ती कुणीही रोखू शकणार नाहीत. वाढत्या वाहन संख्येमुळे जशी वाहतूक कोंडीची डोकेदुखी वाढणार आहे, त्याचप्रमाणे दुरुस्ती दुकानांचा तापही.

पालिकेतील लोकप्रतिनिधी, प्रशासनाने एकत्र येऊन या सर्व वाहन दुरुस्ती दुकानांसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात एकाच भूखंडावर जागा उपलब्ध करून दिल्या, तर रस्त्यावरील अडचण दूर होईल. शिवाय महापालिकेला उत्पन्नही मिळेल.