स्वच्छ भारत अभियानाची ऐशीतैशी

बदलापूर : मध्य रेल्वेवरील अतिशय गर्दीचे मात्र सोयी-सुविधांच्या आघाडीवर अपुरे ठरत असलेल्या बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशी विविध समस्यांमुळे जेरीस आले असताना स्थानकाबाहेर असलेल्या अस्वच्छतेमुळे त्रासात भर पडू लागली आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठय़ा प्रमाणावर कचरा साठला असून स्थानकाबाहेर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकाच्या दिशेने ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.

‘स्वच्छ भारत’ अभियानाचा डंका पिटत कुळगाव बदलापूर नगरपरिषदेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात असले तरी रेल्वे स्थानकासमोरचा कचरा उचलण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापूर स्थानक हे नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते. त्यामुळे या परिसरात फेरीवाल्यांची संख्याही भरपूर आहे. स्थानिक परिसरात मिळेल ती जागा अडवून व्यवसाय थाटणारे फेरीवाले हातगाडीवर निर्माण होणारा कचरा स्थानकाबाहेर उघडय़ावर फेकून देतात. स्थानकापासून काही अंतरावर मासळी बाजार असून येथील विक्रेते आणि स्थानकाच्या बाहेरील दुकानदार ओला आणि सुका मिश्रित कचरा थेट स्थानकाबाहेर उघडय़ावर टाकतात. याठिकाणी कचरा टाकण्यासाठी नगरपरिषदेकडून कचरा पेटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी फेरीवाले, दुकानदार कचरा पेटीत कचरा टाकण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी कचऱ्याचा मोठा ढीग निर्माण होत असतो. या साठलेल्या कचऱ्यामुळे स्थानक परिसरात दूरवर दुर्गंधी पसरत असून पादचाऱ्यांना नाक दाबून या भागातून प्रवास करावा लागत आहे.

नाल्यातही कचरा

बदलापूर पश्चिमेतील स्थानकाच्या बाहेर असणाऱ्या नाल्यातही स्थानक परिसरातील भाजीपाला, दुकानदारांकडून रात्रीच्या वेळेस कचरा टाकण्यात येत आहे. तर काही पादचारी हे निर्माल्य थेट या नाल्यातच फेकून देत आहेत. स्थानक परिसराच्या गृहसंकुलांमधील कचरावेचक हे कचरा एकत्रित करून थेट नाल्यातच टाकत असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले आहे.

दुकानदार, विक्रेत्यांना कचऱ्याचे डब्बे दिले असले तरीदेखील कचरा रेल्वेच्या स्थानक परिसरात टाकत आहेत. नगरपरिषदेची गाडी कचरा संकलन करत असली तरीदेखील कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यावर उपाययोजना म्हणून कचरा टाकणाऱ्यांकडून १५० रुपये इतका दंड अकारला जात आहे.

– विजय कदम, आरोग्य विकास अधिकारी, बदलापूर.