राज्य सरकारच्या निर्णयाची तीन महिन्यांनंतर मीरा-भाईंदरमध्ये अंमलबजावणी

राज्यात एक फेब्रुवारीपासून दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मात्र मीरा-भाईंदर शहरात अद्याप हेल्मेटसक्तीची प्रत्यक्ष अमलबजावणी झाली नाही. आता तीन महिन्यांनंतर पोलिसांना जाग आली असून शहरात दुचाकीस्वाराला हेल्मेट बंधनकारक करण्याचे संकेत ठाणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिले आहे. मुंबई, ठाण्यात हेल्मेटसक्ती असताना मीरा-भाईंदरमध्ये त्याची अमलबजावणी आता करण्यात येत असल्याने हे ‘वरातीमागून घोडे’ असल्याची चर्चा सुरू आहे.

ठाणे ग्रमीण पोलिसांच्या मीरा रोड विभागातर्फे पोलीस मित्र मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला डॉ. महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. मुंबईत उपायुक्त पदावर कार्यरत असताना वेळोवेळी हेल्मेट वापराबाबत मोहीम राबवली आणि ९५ हजारांहून अधिक जणांवर कारवाई केल्याचे पाटील यांनी सांगितले. हेल्मेटची सक्ती अथवा ते न वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे हा या मोहिमेमागचा उद्देश नसून हेल्मेटच्या वापराचे फायदे दुचाकीस्वारांना पटवून देणे हा मुख्य उद्देश आहे. याच धर्तीवर मीरा-भाईंदरमध्येही वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस व पोलीसमित्र यांच्या सहकार्याने हेल्मेट वापराबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमली पदार्थमुक्त शहर

मीरा-भाईंदरमध्ये अमली पदार्थाची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. अमली पदार्थ हा ज्वलंत व गंभीर विषय असून मीरा-भाईंदर शहर अमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर त्याच दिवशी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे महेश पाटील यांनी सांगितले. ठाणे ग्रामीण पोलिसांकडे मनुष्यबळ कमी आहे, परंतु असे असतानाही मीरा-भाईंदरमध्ये गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी आहे याकडे डॉ. पाटील यांनी यावेळी लक्ष वेधले. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने पोलीसमित्रांची आवश्यकता असून जास्तीत जास्त नागरिकांनी पोलीसमित्र म्हणून सामील व्हावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

‘व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रार करा!’

नागरिकांनीच दक्ष राहिले तर पोलिसांवरील बराचसा ताण कमी होतो. आपल्या आसपास कोणत्याही चुकीच्या अथवा अनैतिक गोष्टी घडत असतील तर नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाच्या ७०४५१००१११ अथवा ७०४५१००२२२ या मोबाइलच्या  व्हॉट्स अ‍ॅपवर फोटो व तक्रारी पाठवाव्यात. नियंत्रण कक्षाकडून संबंधित पोलीस ठाण्यांना त्याची त्वरित माहिती दिली जाईल, असे आवाहन डॉ. महेश पाटील यांनी यावेळी केले. मात्र त्याचबरोबर कोणालाही मुद्दाम अडचणीत आणण्यासाठी खोटी माहिती देण्यांऱ्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.