मानसी जोशी, पूर्वा साडविलकर

ठाणे : रंग, पिचकारी आणि पुरणपोळीशिवाय होळी पूर्ण होणे अशक्यच. दरवर्षीच वापरले जाणारे हे साहित्य आणि पदार्थ यंदा नावीन्यपूर्ण रूप घेऊन आले आहे. पिचकाऱ्यांवर पब्जी खेळाचा प्रभाव आहे. आहारातील उष्मांकांविषयी अनेकजण सावध होऊ लागल्यामुळे यंदा डाएट पुरणपोळीला मागणी वाढली आहे. नैसर्गिक रंगांना अनेकांनी पसंती दिली आहे.

लष्करातील जवानांकडील बंदुकांसारख्या दिसणाऱ्या आणि पब्जी खेळातील बंदुकांच्या आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. तरुणांमध्ये या पिचकाऱ्यांविषयी आकर्षण आहे. छत्रीच्या आकोराची पिचकारी, हाताला बांधायच्या आणि मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या कार्टूनची चित्रे असलेल्या पिचकाऱ्यांनाही मोठी मागणी आहे. यात डोरेमॉन, छोटा भीम, शिनचॅन, मोटू पतलू, बार्बी आणि मिकी माऊसच्या पिचकाऱ्या अधिक विकल्या जात असल्याचे पिचकारी विक्रेते इस्माईल लकडावाला यांनी सांगितले.

नैसर्गिक रंगांना प्राधान्य

गेल्या काही वर्षांपासून अनेकजण त्वचेला हानीकारक न ठरणाऱ्या नैसर्गिक रंगांना प्राधान्य देऊ लागले आहेत. ठाणे, डोंबिवली आणि कल्याणमधील महिला बचत गट आणि समाजसोवी संस्था हे रंग तयार करण्याचे प्रशिक्षण देतात. पळसाची फु ले, बीट, पालक, माठ, झेंडू, गुलाब, कांचन, अस्टर, जास्वंद, ताम्हण आणि डिकसा या वनस्पतींचा वापर हे रंग तयार करण्यासाठी केला जातो, असे पर्यावरण अभ्यासक चित्रा म्हस्के यांनी सांगितले.

पुरणपोळी महागली

गेल्या वर्षी २३ रुपयांना मिळणारी एक पुरणपोळी यंदा पुरणपोळीचे साहित्य महागल्याने २६ ते २७ रुपयांना विकण्यात येत आहे, असे पुरणपोळी विक्रेत्या ऊर्मिला पाटील यांनी सांगितले. डाएट पुरणपोळीला मागणी वाढली आहे. ही पुरणपोळी करताना साखर आणि मैद्याचा वापर कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे अशी पोळी करणे, कौशल्याचे काम असते, असेही त्यांनी सांगितले.