अडचणीच्या पादचारी पुलामुळे प्रवाशांची फरफट, बदलापूरच्या धर्तीवर विचार होण्याची मागणी

अंबरनाथ शहराची लोकसंख्या अडीच लाखांच्या जवळपास पोहोचली असून दिवसेंदिवस त्यात भर पडते आहे. त्यामुळे सर्वाधिक चाकरमान्यांची संख्या असलेल्या नागरिकांचा भार रेल्वे स्थानकावर आणि पादचारी पुलांवर पडतो आहे. त्यामुळे बदलापूरच्या धर्तीवर अंबरनाथ रेल्वे स्थानकातही होम प्लॅटफॉर्मचा विचार व्हावा, अशी मागणी आता समोर येते आहे.

अंबरनाथ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्याच वेळी त्याचा भार रेल्वे सेवेवर पडतो आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकातील पूल हे फलाटाच्या दोन्ही टोकांना आहेत. त्यातील बदलापूरच्या दिशेला असलेल्या पादचारी पुलावर सर्वाधिक भार असतो. कल्याणच्या दिशेने असलेला पूल हा झोपडपट्टीच्या बाजूला उतरत असल्याने त्याचा वापर केला जात नाही. त्यात गर्दुल्ले आणि भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे या पादचारी पुलाचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो. शहराच्या दोन्ही भागांतील रिक्षा थांबे गाठण्यासाठी बदलापूरच्या बाजूच्या पुलावरूनच जावे लागते. त्यामुळे या पादचारी पुलावर मोठय़ा प्रमाणावर भार येतो. अंबरनाथ रेल्वे स्थानकातील मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईवरून येणाऱ्या लोकल या फलाट क्रमांक दोनवरून सुटतात. तसेच बदलापूर, कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल फलाट एकवर येत असतात. तसेच बदलापूरकर अंबरनाथ लोकलने अंबरनाथ स्थानकावर येऊन मागून येणाऱ्या बदलापूर, कर्जत किंवा खोपोली लोकल पकडत असतात. त्यामुळे या दोन फलाटावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी पाहावयास मिळते.

अंबरनाथ स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या एकमेव पुलावरही भाजी विक्रेते आणि फेरीवाले आपले बस्तान मांडून असतात. त्यामुळे प्रवाशांना येथून जाण्यासाठी मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात पादचारी पुलावर छप्पर नसल्याने नागरिकांना ऊन-पावसाचा सामना करत येथून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे अनेकदा नागरिक फलाट क्रमांक एक-दोनवरून तीनवर जाण्यासाठी रूळ ओलांडतात. त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. येथेही अतिरिक्त पादचारी पूल किंवा होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करून या गर्दीला विभागता येऊ  शकते.

त्यामुळे एकाच पादचारी पुलावर येणारा भार कमी होऊन फलाटावरून बाहेर पडण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली स्थानकाप्रमाणे आणि बदलापूरच्या धर्तीवर अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक आणि दोनच्या गर्दीचा विचार करता येथेही होम प्लॅटफॉर्मचा विचार व्हावा, असे पत्र स्थानिक नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी खासदार श्रीकांत िशदे यांना दिले आहे.

जमीन रेल्वेप्रशासनाचीच

येथील फलाट क्रमांक एक शेजारील बहुतांश जमीन ही रेल्वे प्रशासनाचीच आहे. त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात ज्या कारणामुळे होम प्लॅटफॉर्मचा प्रश्न रेंगाळला आहे. तो प्रश्न अंबरनाथ येथे नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मनात आणल्यास लवकरच प्रवाशांना होम प्लॅटफॉर्म मिळू शकतो, अशी आशा प्रवासी व्यक्त करत आहेत.