लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारनं मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे दीड महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या मद्यप्रेमींची झुंबड मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर पहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील मद्य विक्रीच्या दुकानांसमोरील गर्दी काही ओसरण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत वसईत मद्य खरेदीसाठी शहराबाहेरील नागरिकही गर्दी करू लागल्याने करोना संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात वाढण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

मागील चार दिवसांपासून वसई विरार शहरात मद्य विक्रीला सुरवात झाली आहे. तेव्हापासून विविध ठिकाणी असलेल्या मद्य विक्रीच्या दुकानात मद्याच्या बाटल्या खरेदीसाठी तळीरामांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. मुंबईसह काही शहरांत करोना विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणात असल्याने त्याठिकाणी केवळ एक दिवस झालेल्या मद्यविक्री नंतर मद्याविक्रीची दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शहराबाहेरील मद्यप्रेमींनी आपला मोर्चा वसईकडे वळविला आहे.

वसईत करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामध्ये मुंबईत काम करणारे व त्या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे करोनाचे संकट अधिक गडद बनू लागले आहे. असे असतानाही वसई विरार शहरातील वसई, नायगाव, सातीवली, वसंत नगरी, नालासोपारा, मधूबन, विरार यासह विविध ठिकाणी असलेल्या मद्याच्या दुकानांवर मद्यप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास नायगाव पूर्वेतील मद्याच्या दुकानासमोरही सामाजिक दुरीकरणाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. नुकताच नायगाव पूर्वेतील परिसर हा करोनामुक्त झाला आहे. मात्र सध्या नायगावमध्ये मद्य खरेदीसाठी इतर ठिकाणच्या भागातील नागरिकही येत असल्याने करोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे येथील नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

शहराबाहेरील नागरिक आलेच कसे?

करोनामुळे सर्वत्र टाळेबंदी आहे. मात्र या टाळेबंदीतही वसई विरार शहरात मद्य खरेदीसाठी आले कसे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहे. टाळेबंदी असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे नागरिकांची विचारपूस करूनच नागरिकांना प्रवेश दिला जातो. मात्र, तरीही हे मुंबई व इतर शहरातील नागरिक मद्य खरेदी करण्यासाठी येत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.