‘तौक्ते’पाठोपाठ बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने केरळ, कोकण, मुंबई परिसर आणि गुजरातमध्ये धुमाकूळ घातला असताना आता देशाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे उत्तर अंदमान आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. २६ मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. मात्र, तौक्तेनंतर याही चक्रीवादळाने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहाला गती मिळणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहाला गती मिळाली. चक्रीवादळाच्याच काळात हवामान विभागाने मोसमी वाऱ्यांच्या केरळ प्रवेशाबाबत सुधारित अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार मोसमी वाऱ्यांचे केरळमध्ये ३१ मे रोजीच आगमन होणार असल्याचा अंदाज जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी २१ मे रोजी मोसमी वारे अंदमानात सक्रिय होणार असल्याचेही हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

अंदमानात मोसमी वाऱ्यांचे आगमन होत असल्याच्या काळात उत्तर अंदमान आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. २२ मेनंतर ७२ तासांच्या कालावधीत रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत आहेत. वायव्येकडे सरकून ते २६ मे रोजी पश्चिाम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याच्या काळात मोसमी वारे अधिक गतिमान होणार आहेत.

‘तौक्ते’चे राजस्थानमध्ये  कमी दाब क्षेत्रात रूपांतर

तौक्ते चक्रीवादळ १७ मे रोजी रात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकले. भूभागाशी संपर्क आल्यानंतर त्याचा वेग कमी झाला. १८ मे रोजी त्याची तीव्रताही घटली. गुजरातवरून सरळ राजस्थानपर्यंत जात हे चक्रीवादळ विरले. सध्या राजस्थानमध्ये त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले असून, तेथे पाऊस होत आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस

तौक्ते चक्रीवादळ निघून गेल्यानंतरही मुंबईसह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम आहे. बुधवारीही या दोन्ही विभागात बहुतांश ठिकाणी दिवसभर पावसाळी स्थिती कायम होती. मुंबई, अलिबाग, पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी भागात पावसाची नोंद झाली.