देशातील पहिली रेल्वे ठाणे स्थानकातून धावली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या स्थानकाचा जीव प्रवाशांच्या अतोनात गर्दीने सध्या नकोसा करून सोडला आहे. मुंबईच्या दिशेने ये-जा करणारी फास्ट लोकल ठाणे स्थानकात थांबते. त्यामुळे या स्थानकाच्या लगत असलेल्या कळवा आणि मुंब्रा स्थानकाचा भारही ठाण्यावर पडतो. हे जरी खरे असले तरी गेल्या काही वर्षांत कळवा-मुंब्रा स्थानकांमध्येही प्रवाशांची गर्दी दुपटीने वाढली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या हे लक्षात आले असून नव्या प्रकल्पाच्या आखणीत आता कळव्याला अनन्यसाधारण महत्त्व येऊ लागले आहे. एरवी कुणाच्या गणतीतही नसलेल्या या स्थानकात वेगवेगळे विकास प्रकल्प आखले जाऊ लागले आहेत. कल्याण-कर्जत, खोपोली आणि कसाऱ्याकडून नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकात येण्याऐवजी कळवा स्थानकातूनच थेट वाशीला जाण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने आखला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी यासंबंधीची ठोस घोषणा केली. खरे तर हा जुनाच प्रकल्प. मात्र निधीची पुरेशी तरतूद नसल्याने तो चर्चेपुरताच मर्यादित राहिला. यंदा मात्र कळव्यावर प्रभूकृपा झाली आणि कागदावरील हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. सुमारे ४०५ कोटी रुपयांची भरीव तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. या मार्गासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करून कल्याण ते वाशी हा थेट प्रवास शक्य होईल, असा दावा केला जात आहे.
कर्जत-कसारा मार्गावरील अपुऱ्या शटल सेवेमुळे ठाणे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यावर उपाय म्हणून नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना ठाण्याऐवजी कल्याणहून थेट वाशीला जाणाऱ्या मार्गाच्या प्रकल्पाची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांना कल्याणहून थेट नवी मुंबईला जाता येणार आहे. या नव्या मार्गाचा प्रवास मुंब्रा स्थानकापर्यंत मध्य रेल्वेला समांतरच असेल. पुढे कळवा येथून मात्र तीन किलोमीटर लांबीचा उन्नत (एलिव्हेटेड) रेल्वे मार्ग तयार करून गाडी ऐरोली स्थानकापर्यंत जाऊ शकणार आहे. त्यासाठी उन्नत मार्गावर वरच्या बाजूला सध्याच्या कोपरसारखे आणखी एक कळवा स्थानक उभारण्यात येईल. अर्थसंकल्पात त्यासाठी ४०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मध्य आणि हार्बर दोन्ही मार्ग जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे प्रवाशांची सोय होऊन ठाणे स्थानकातील गर्दी आटोक्यात येऊ  शकणार आहे. एमयूटीपी ३ मध्ये या कामाचा समावेश असून २०१४ मध्ये ते काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अर्थिक तरतुदींच्या आभावामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात त्याचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी हे काम सुरू होऊन २०१८ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर उन्नत मार्गाचे काम सुरू होऊ शकणार आहे. मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.  २०१८ पर्यंत या मार्गावर उपनगरी गाडीच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यासाठी बारा डब्यांच्या नव्या दोन गाडय़ाही विकत घेतल्या जाणार आहेत.
कल्याण-वाशी व्हाया कळवा मार्गाचे फायदे.
ठाणे स्थानकावरील भार कमी होण्यास या प्रकल्पामुळे मदत होऊ शकणार आहे. नवी मुंबईला जाणाऱ्या कल्याण, कर्जत, कसारा आणि खोपोली या भागातील प्रवाशांबरोबरच डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळव्याच्या प्रवाशांनाही याचा लाभ घेता येऊ शकणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकडे जाणारे प्रवासी विभागले जाऊन पर्यायाने मध्य रेल्वेच्या मार्गावरील गर्दीसुद्धा कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे.

कळवा, मुंब्रा आणि दिवा ही धिम्या मार्गावरील स्थानके सध्या गर्दीचे केंद्रबिंदू ठरत असून या भागातील गर्दीच्या विभागणीसाठी नवी मुंबईकडे जाणारा नवा रेल्वे मार्ग रेल्वेकडून मंजूर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या या मार्गाचे सर्वेक्षण सुरू असून लवकरच याचे काम सुरू होऊ शकणार आहे, त्यामुळे कळवा, मुंब्रा आणि दिव्याची प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. शिवाय यामुळे ठाणे स्थानकातील गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या भागातील प्रवाशांना नव्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
– ए. के. सिंग, रेल्वे जनसंपर्क अधिकारी