मागणीपेक्षा आवक वाढल्याने दर गडगडले; विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांकडून फुले कचराकुंडीत

व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावण महिन्यात वाढलेल्या मागणीमुळे फुले महाग होत असल्याचे दर वर्षी दिसणारे चित्र यंदा उलटे दिसत आहे. श्रावण महिना सुरू होताच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांत फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक झाली आहे. मात्र, त्या तुलनेत यंदा मागणी कमी असल्याने फुलांचे दर गडगडले आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी तर अपेक्षित दर मिळत नसल्याने काही टन फुले कचऱ्यात फेकून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई परिसराला जुन्नर, नाशिक, नगर या भागांतून फुलांचा पुरवठा होतो. तसेच बंगळूरु आणि गुजरातमधूनही फुले या बाजारात येतात. यंदा पाऊस चांगला झाल्याने फुलांचे उत्पादन वाढले आहे. श्रावण महिन्यात फुलांची वाढती मागणी पाहून व्यापाऱ्यांनीही मोठय़ा प्रमाणात फुलांची आवक केली. परंतु, यंदा ग्राहकांकडून फूलखरेदी कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

‘गेल्या आठवडय़ात शुक्रवार पासून फुलांनी भरलेल्या जादा गाडय़ा कल्याण-मुंबई येथे दाखल झाल्या. व्यापाऱ्यांनी यातील बराचसा माल खरेदी केला. मात्र पावसाचे पुनरागमन झाल्याने फुलांना मागणी कमी झाली असून खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सोमवारपासून खराब झालेली फुले ठाणे आणि कल्याणच्या कचराभूमीवर फेकण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल चार हजार किलो इतकी फुले फेकून दिली आहेत,’ अशी माहिती कल्याण कृषी समितीचे सचिव शामकांत चौधरी यांनी दिली.

एरवी २५-३० गाडय़ा कल्याण फुलाबाजारात दाखल होतात. दरम्यान, मंगळवारी मात्र हे प्रमाण कमी झाले. जेमतेम १९ फुलांच्या गाडय़ा दाखल झाल्या आहेत. माळशेज घाट बंद केल्यामुळेदेखील गाडय़ा कमी झाल्या असल्याचे साहाय्यक सचिव यशवंत पाटील यांनी सांगितले. जुन्नर येथून येणारी फुले खराब झाल्याने ती घाऊक व्यापाऱ्यांना विकताना भाव कमी होतो. त्यामुळे माळशेज घाटातच अनेकांनी फुले फेकून दिल्याची माहिती शेतकरी गणेश हांडे यांनी दिली. त्यामुळे मागील आठवडय़ात ३० रुपये किलोने  मिळणारा गोंडा सध्या ५ रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. तर १५० रुपये किलोने विकली जाणारी शेवंती सध्या ६० रुपये किलोने विकली जात आहे.

गणपती, दिवाळी, दसरा या सणांना २०० गाडय़ांची आवक होत असते. पाऊस चांगला झाल्याने फुलांचे उत्पादन वाढले आहे; परंतु मागणी कमी असल्याने फुले खराब होत आहेत. त्यामुळे फेकून द्यावी लागत आहेत. सोमवारी कल्याण कृषी बाजारात दोन ट्रक भरून फुले फेकून देण्यात आली. गणपतीपर्यंत या फुलांचे भाव नक्कीच वधारतील.

– शामकांत चौधरी, कल्याण कृषी समिती, कल्याण