कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णांनी करोना चाचणी करुन घेतल्यानंतर चाचणी अहवाल मिळण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत रुग्णांची तब्बेत खालावते तसेच काही संशयीत रुग्णांचा बाहेरील वावर सुरु रहात असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत आहे, असा निष्कर्ष महापालिकेने काढला आहे. करोनासंबंधी चाचण्या वाढविण्यात आल्या असल्या तरी वेळेवर अहवाल मिळत नसल्याने संसर्ग आटोक्यात येत नाही, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील संशयीत रुग्णांच्या चाचण्यांचे नमुने स्थानिक प्रयोगशाळांकडून मुंबई, पुणे येथे पाठविले जातात. तेथे राज्याच्या विविध भागातून करोना चाचणी अहवाल आलेले असतात. कल्याण, डोंबिवलीतील प्रयोगशाळेत चाचण्यांचे निष्कर्ष अहवाल मिळेपर्यत तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे, अशी माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली.

दरम्यानच्या काळात रुग्ण ताप, सर्दी, खोकला, घसा दुखीने बेजार झालेला असतो. तो आपल्या कौटुंबिक डॉक्टरच्या सल्ल्याने घरात राहून औषधे घेतो. चार दिवसांनी अहवाल आल्यानंतर रुग्ण करोना सकारात्मक येतो. त्याच्यावर पालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले की मग  दोन दिवसात त्या घरातील इतर सदस्य एका पाठोपाठ बाधित होतात, अशी माहिती खासगी डॉक्टरांनी दिली. प्रतिजन चाचण्या करण्याचे सुचविले जाते पण ते ऐकत नाहीत. चाचणी सकारात्मक आली तर पालिकेचे कर्मचारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जातील, अशी भीती अनेक रहिवाशांना आहे.

दाखल चिठ्ठीचा वेळकाढूपणा

कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीच्या कोणत्याही भागात करोना रुग्ण आढळून आली की त्याला पालिका नियंत्रित ९४ करोना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी महापालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर, कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्ण दाखल चिठ्ठी घेण्यासाठी यावे लागते. ही चिठ्ठी घेण्यासाठी करोना रुग्णाचा नातेवाईक आला तर त्याला ती चिठ्ठी दिली जात नाही. यासाठी तो रुग्ण तेथे हजर असावा लागतो, अशी पालिकेची अट आहे. त्यामुळे करोना रुग्ण वृध्द, ज्येष्ठ नागरिक, अपंग, इतर सहव्याधी असलेला असला तरी त्याला रिक्षा किंवा खासगी वाहनातून पालिका रुग्णालयात आणावे लागते. या प्रवासात सहसोबती प्रवाशी नातेवाईक बाधित होतात. अशाप्रकारच्या चिठ्ठय़ा घेण्यासाठी करोना रुग्ण, त्याचे बाधित नसलेले नातेवाईक पालिका रुग्णालयांमध्ये चिठ्ठी घेण्यासाठी उभे असतात. गेल्या वर्षांपासून हा चिठ्ठी देण्याचा गोंधळ सुरू आहे, अशा तक्रारी नगरसेवक, रुग्ण सेवेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.