पावसाळ्यात इमारती कोसळून मोठय़ा प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरांत २६०० इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेमार्फत शहरांतील इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींची संख्या १०० ते १५०ने वाढल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे, गेल्या वर्षभरात अतिधोकादायक इमारती पाडण्यात आल्याने अशा इमारतींची संख्या ५८ वरून ३६ वर घसरली आहे.
पालिकेच्या सर्वेक्षणानुसार, मुंब्रा आणि दिवा भागांत १३३० तर वागळे इस्टेट परिसरात ४३९ इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा इमारतींतील रहिवाशांना घरे रिकामी करून इमारतींचे बांधकाम तोडण्यात यावे, अशा नोटिसा पालिकेमार्फत पाठवण्यात येत आहेत. वागळे, मुंब्रा तसेच दिवा परिसरांत बेकायदा इमारतींची संख्या मोठी आहे. यातीलच अनेक इमारती धोकादायक बनल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील नौपाडा तसेच अन्य जुन्या परिसरांतील जुन्या इमारतीही धोकादायक इमारतींच्या यादीत सामील झाल्या आहेत.
गेल्या काही वर्षांची परंपरा मोडीत काढत यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन
महिने आधीच महापालिका प्रशासनाने तिन्ही शहरांतील धोकादायक इमारतींची यादी तयार केली असून त्यामध्ये ३६ अतिधोकादायक तर २६१६ धोकादायक इमारतीचा समावेश आहे. गेल्या वर्षी शहरामध्ये ५८ अतिधोकादायक तसेच अडीच हजार धोकादायक इमारती होत्या. मात्र त्यापैकी अनेक इमारतींचे बांधकाम तोडण्यात आल्याने यंदा हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून येते. नव्या यादीतील आकडेवारीनुसार एकटय़ा मुंब्रा-दिवा भागांत २७ अतिधोकादायक तर १३३० धोकादायक इमारती आहेत. यानंतर वागळे परिसराचा क्रमांक लागतो.
इमारतींची आकडेवारी
प्रभाग         धोकादायक             अतिधोकादायक
नौपाडा           २६९                           –
रायलादेवी      ८४                            –
उथळसर       ११२                             –
वर्तकनगर    २८                           –
वागळे         ४३९                          –
कळवा        ८४                           ७
कोपरी         ७६                          –
लोकमान्य  ७८                           –
माजीवाडा   ७४                           २
मुंब्रा            १३३०                     २७

एकूण     २६१६                          ३६