ठाणे : मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी एक ४० वर्षीय महिला जखमी अवस्थेत आढळून आली. कलावती यादव असे या जखमी महिलेचे नाव असून, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी आठच्या सुमारास लोहमार्ग पोलिसांना कलावती यादव या जखमी अवस्थेत आढळून आल्या. लोहमार्ग पोलिसांनी त्यांना तात्काळ ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. कलावती या मुंब्रा येथे राहत असून त्या एका रुग्णालयात परिचारीका म्हणून काम करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, कलावती या लोकल गाडीतून पडल्या की त्यांना लोकलची धडक लागली, हे अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.