कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णांची मागील चार महिन्यांच्या काळातील मंगळवापर्यंतची एकूण रुग्ण संख्या २१ हजार ६२० झाली आहे. या कालावधीत एकूण ४०४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून ही माहिती उपलब्ध झाली आहे.

पालिकेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या करोना रुग्णाच्या आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीत दररोज किमान ५० ते ७५ आकडय़ांचा फरक येतो. त्यामुळे पालिकेच्या नोंदी करोना रुग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. मुंबई निवासी पत्ता असलेल्या, सकारात्मक पण चाचणी अहवाल न आलेल्या रुग्णांची नोंद दुसऱ्या दिवशी पालिकेकडून घेतली जाते. त्यामुळे हा फरक येत असल्याचे कळते. कडोंमपा हद्दीत दररोज सरासरी ९ ते १५ दरम्यान करोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. एमएमआरडीए क्षेत्रातील सहा पालिकांमध्ये मुंबई पालिकेनंतर सर्वाधिक करोना रुग्ण कल्याण -डोंबिवली पालिकेत सापडत आहेत. यापूर्वी ५०० च्या दरम्यान असणारा करोना रुग्णांचा आकडा गेल्या आठवडय़ापासून ४००, ३०० आणि आता २०० असा कमी होत आहे.

महापालिका हद्दीत प्रभागांमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रतिजन चाचण्या, तापाचे दवाखाने व इतर उपाययोजना करीत करोना नियंत्रण मोहीम वेगाने सुरू झाली आहे.  मंगळवारच्या करोना रुग्णांच्या नोंदीनुसार पालिका हद्दीत एकूण पाच हजार ७७९ रुग्ण उपचार घेत आहेत. सुखरूप घरी गेलेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ९२७ आहे. मंगळवारी ३०६ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले.