05 April 2020

News Flash

खाद्य वस्तूंचा काळाबाजार

काही ठिकाणी पोलिसांना  यामध्ये हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागत होती. 

कल्याण, डोंबिवलीत जादा दराने विक्री; संचारबंदीमुळे मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट

कल्याण : करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी सुरू असताना आता संपूर्ण देशामध्ये ती लागू केल्यामुळे कल्याण, डोंबिवलीत अनेक ठिकाणी खाद्य वस्तूंचा काळाबाजार सुरू झाला आहे. जादा भावाने खाद्य वस्तूंची विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे शहर परिसरात दोन दिवसांपासून रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे.

कल्याण, डोंबिवली, २७ गाव, शिळफाटा परिसरातील रस्ते ओस पडले. शहरातील मुख्य, अंतर्गत रस्ते, चौकांमध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली होती. अत्यावश्यक असलेल्या व्यतिरिक्त इतर वाहन चालकांची पोलीस अडवणूक करत होते. तसेच पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांना पोलीस सामुहीक चोप देत असल्याचे चित्र होते.  देश बंदची घोषणा करताच अनेक रहिवासी परिसरातील किराणा दुकान, दूध दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करुन होते. काही दुकानांमध्ये खाद्य वस्तूंची विक्री जादा दराने केली जात असल्याचा ग्राहकांच्या तक्रारी होत्या.

काही ठिकाणी पोलिसांना  यामध्ये हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागत होती.  काही ठिकाणी  दोन ग्राहकांमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवून रांगेत उभे राहून  ग्राहकांना किराणा वस्तू देण्यासाठी दुकानदारांना पोलिसांची मदत घ्यावी लागत होती.  कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची अफवा समाज माध्यमांमध्ये पसरविण्यात आली होती. परंतु, बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी सांगितले, बाजार समिती बंद करण्याचे कोणतेही आदेश नाहीत. अत्यावश्यक सेवेत समितीमधील व्यवहार मोडतात. बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे मागणी करुन विविध भागातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी अडवू नये अशी मागणी केली. या सूचनेची दखल घेऊन उपायुक्त पानसरे यांनी शेतकरी आणि अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांना पोलिसांनी त्रास देऊ नये असे आदेश स्थानिक पोलिसांना दिले.

कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनीही स्थानिक पोलीस बाजार समितीत भाजीपाला, धान्य घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस खूप त्रास देत असल्याच्या तक्रारी उपायुक्तांकडे केल्या होत्या. संचारबंदी असली तरी बाजार समिती अत्यावश्यक सेवा म्हणून सुरूच राहील, असे सभापती थळे यांनी सांगितले.

पोलिसांतर्फे आवाहन

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात पोलिसांनी बुधवारी सकाळपासून किराणा दुकान, चौकात उभे राहणाऱ्या नागरिकांना ध्वनीक्षेपण यंत्रणेवरुन आवाहन करीत घरात राहण्याच्या सूचना केल्या. जे रहिवासी सांगुनही ऐकत नाहीत. सोसायटीच्या आवारात घोळक्याने उभे आहेत. त्यांनाही पोलिसांनी मग चोप दिला. शहरातील अनेक सोसायटय़ांनी फेरीवाले, खासगी टपाल वाटपे, भंगार, रद्दीवाले यांना मज्जाव केला आहे. सोसायटीत कोणीही पाहुणा मोठ्या बॅगा, पिशव्या घेऊन येत असेल तर त्याचीही चौकशी केल्या शिवाय त्याला सोसायटीत प्रवेश दिला जात नाही. २७ गावांमध्ये अनाहूत पाहुणा गेला की त्याची विचारपूस केल्यावर मगच त्याला गावात प्रवेश दिला जात आहे. काही गावांच्या प्रवेशद्वारावर थेट वाहने गावात येऊ नयेत म्हणून बांबूंचे अडथळे उभे करण्यात आले आहेत.

ग्राहकांची लूट

पानटपऱ्या बंद झाल्याने  इमारत, झाडाच्या आडोशाला उभे राहून सिगारेट, विडी, तंबाखुची विक्री होत आहे. पाच रुपयाला मिळणारी तंबाखुची पुडी १० ते १२ रुपयाला तर सिगारेट पाकिटे महागडय़ा दराने विकली जात आहेत. अंडे सात ते आठ रुपयांना विकले जात आहे. किराणा मालाचीही जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:02 am

Web Title: kalyan dombivali black market of food items akp 94
Next Stories
1 दुर्गाडी पुलाजवळ दुचाकी पोलीस व्हॅन धडकेत पोलिसाचा मृत्यु
2 साठेभाजीसाठी धावाधाव!
3 दूधविक्रेत्यांना मारहाण झाल्याने वितरक संतप्त
Just Now!
X