दुराव्यस्थेमुळे विक्रेत्यांचे नुकसान

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या फूल मार्केटची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात येथे प्रचंड पाणी साचत असल्याने विक्रेत्यांना फुलांची विक्री करण्यासाठी बाजारात बसताच येत नाही. शिवाय शेडचे पत्रे व लोखंडी खांबही मोडकळीस आले असल्याने ते कधीही कोसळू शकतात. पावसामुळे विक्रेत्यांचे दररोज प्रचंड नुकसान होत असून या शेडची दुरुस्ती करण्याची परवानगी कल्याण डोंबिवली महापालिकेने बाजार समितीला द्यावी, याविषयी प्रस्ताव मांडण्यात आला असून येत्या सोमवारी होणाऱ्या महासभेत हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

या जागेवर पालिकेचे नियंत्रण आहे. तेथील गाळे आणि त्यांचा व्यवहार हा पालिकेच्या अखत्यारीत येतो. पालिकेचे पूर्ण क्षमतेने या बाजाराकडे नियंत्रण नसल्याने येथे प्रचंड घाण आणि अव्यवस्थापन पाहायला मिळते. सखल भागात असलेल्या या मार्केटमध्ये पावसाळ्यात दरवर्षी प्रचंड पाणी साचते. त्यामुळे विक्रेत्यांना येथे फूल विक्रीसाठी बसता येत नाही. नाशीवंत फुलांचा कचरा हा त्याजागेतच पाठीमागे टाकला जात असल्याने दरुगधीचाही सामना विक्रेत्यांना आणि ग्राहकांना करावा लागतो. शेडचे पत्रे आणि लोखंडी खांब हे मोडकळीस आल्याने ते कधीही कोसळून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे फूल बाजार समितीचे अध्यक्ष बजरंग हुलवळे यांनी सांगितले.

पालिकेने पुन्हा ही जागा बाजार समितीला हस्तांतरित करावी यासाठी शासकीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. ही जागा बाजार समितीला मिळाल्यास येथे दोन माळ्यांची सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे, त्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा खर्चही अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

दादरनंतर फुलांचे मोठे मार्केट कल्याणमध्ये असल्याने या बाजारात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, मुंब्रा आदी परिसरातील घाऊक विक्रेते आणि सामान्य खरेदीदार येतात. दर दिवशी येथे २२ टन फुलांची आवक होत असून सणासुदीला ती जास्त होते. सर्व प्रकारची फुले या बाजारात उपलब्ध असल्याने ग्राहक मोठय़ा प्रमाणात असतात. परंतु पावसाळ्यात या बाजाराची होणारी दयनीय अवस्था पाहता ग्राहकही त्याकडे पाठ फिरवताना यंदा दिसून येत असल्याचे हुलवळे यांनी सांगितले.

पालिकेने ही जागा त्वरित समितीला द्यावी, अन्यथा विक्रेत्यांची होणारी गैरसोय पाहता किमान या जागेचे पुनर्वसन करण्याची हमी तरी समितीला द्यावी याविषयीचे निवेदन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर, बाजार समिती सभापती, सचिव या सर्वाना देण्यात आले आहेत. याविषयी येत्या सोमवारच्या महासभेत विषय पटलावरही हा विषय असून नक्कीच यावर तोडगा निघेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

सध्याचे फूल मार्केट तोडून त्याजागी नव्याने फूल मार्केट उभारण्याच्या मागणीस २०१३ सालच्या महासभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली होती. त्यासाठी पुढील अर्थसंकल्पात एक कोटीची तरतूद करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीची ही जागा असल्याने समितीनेच ती विकसित करण्याबाबत समिती आग्रही असल्याने त्याचे पुन्हा काही झाले नाही. यावर्षी पुन्हा हा विषय महासभेच्या विषय पटलावर असून यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

कल्याणच्या फूल बाजाराची पाश्र्वभूमी

कल्याण स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना विस्थापित करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेला १९९५ मध्ये तीन हजार ८२५ चौरस मीटरचा भूखंड देण्यात आला होता. या भूखंडावर ५९३ गाळे असून त्यापैकी १९५ गाळ्यांचा ताबा बाजार समितीकडे आहे. पालिकेने एक एकर जागा स्वत:कडे ठेवली आहे. समितीच्या आवारात असलेल्या या जागेवर सध्या फूल बाजार भरविला जातो.